निर्भयाप्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी नाही

निर्भयाप्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी नाही

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने निर्भयाच्या मारेकर्‍यांना येत्या २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही, असे येथील पतियाळा हाऊस कोर्टाने स्पष्ट केले आहे. दया अर्ज प्रलंबित असल्यामुळे डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. फाशी देण्याची नवी तारीख काय असेल हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर निश्चित करण्यात येईल. तुरुंग प्रशासनाने शुक्रवारी १७ जानेवारीपर्यंत कोर्टाला स्टेटस रिपोर्ट द्यायचा आहे.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली असून त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय देत पतियाळा हाऊस कोर्टाने ७ जानेवारीला डेथ वॉरंट जारी केला होता. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता. दिल्ली कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला आदेश दिले आहेत की तुरुंग प्रशासनाने १७ जानेवारीपर्यंत फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. तुरुंग प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असे कोर्टाने म्हटले आहे.

त्याची दया याचिका दिल्लीचे उपराज्यपाल आणि देशाच्या राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे २२ जानेवारीचा डेथ वॉरंट रद्द केला जावा, असे मुकेश सिंह याने आपल्या याचिकेत म्हटले आहे. चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. कारण नियमांनुसार एकाच प्रकरणात एकापेक्षा अधिक दोषींना फाशी दिली असेल तर जोपर्यंत एका जरी दोषीची दया याचिका प्रलंबित असेल तर त्यावर निर्णय येईपर्यंत कोणत्याही दोषीला फासावर लटकवले जात नाही, असे दिल्ली हायकोर्टाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे.

First Published on: January 17, 2020 6:55 AM
Exit mobile version