खुशखबर! दिवाळीपासून ‘या’ १० लाख नोकरदारांचा पगार होणार दुप्पट

खुशखबर! दिवाळीपासून ‘या’ १० लाख नोकरदारांचा पगार होणार दुप्पट

दिवाळीपूर्वीच पगार

मोदी सरकार कायमस्वरुपी नोकरी रद्द करुन त्याजागेवर कमी पगारात कंत्राटावर कर्मचारी घेत असल्याची टीका केली जात होती. मात्र, कंत्राटावर काम करणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या १० लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. येत्या दिवाळीपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या अखत्यारित कायमस्वरुपी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे. कायमस्वरुपी काम करणारे आणि कंत्राटावर काम करणारे कर्मचारी समान काम करतात. त्यामुळे त्यांच्या वेतनातही समानता आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयच्या (पीएमओ) प्रशिक्षण विभागाने बुधवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा – नियम बदलले! PF चे पैसे काढणे आता एकदम सोप्पे

कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी सरकारचे नवे आदेश

केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवा आदेश जारी केला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ८ तास काम केले तर त्यांनाही नियमित कर्मचाऱ्यांएवढाच पगार दिला जाईल. कर्मचारी जितके दिवस काम करणार, तितक्या दिवसांचा त्यांना पगार मिळणार आहे. मात्र, आदेश ४९०१४/१/२०१७ नुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने पगार देण्याचा अधिकार नाही.

दुप्पटीने होईल पगारवाढ

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने नेमून दिलेले किमान वेतन दिले जायचे. मात्र, आता त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार पगार मिळणार आहे. नव्या नियमानुसार या कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने फायदा होणार आहे. उदाहरणार्थ दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार प्रती महिना १४ हजार रुपये असेल तर नव्या कायद्यानुसार त्यांना ग्रुप डी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे किमान वेतन म्हणजे ३० हजार रुपये दिले जाईल. सुप्रीम कोर्टाने ‘समान कार्याला समान वेतन’ असा निर्णय दिल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

First Published on: September 13, 2019 10:21 AM
Exit mobile version