पाकिस्तानात रक्तपात होऊ शकतो, इम्रान खान यांच्या दाव्यावर शरीफ सरकारचा इशारा

पाकिस्तानात रक्तपात होऊ शकतो, इम्रान खान यांच्या दाव्यावर शरीफ सरकारचा इशारा

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांनी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याबाबत केलेल्या नव्या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांच्या या दाव्यांमुळे देशात रक्तपात घडू शकतो आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) नेतृत्वाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.

आसिफ अली झरदारी हे आपल्या हत्येचा कट रचत आहेत आणि त्यासाठी त्यांनी एका दहशतवादी संघटनेला पैसेही दिले आहेत. आपल्या हत्येचे दोन वेळा अयशस्वी प्रयत्न देखील झाले. आता प्लॅन सी तयार करण्यात आला आहे, असा आरोप इम्रान खान यांनी अलीकडेच केला आहे. दुसरीकडे, इम्रान खान यांच्या या आरोपांविरोधात आपला पक्ष कायदेशीर मत घेत असल्याचे पीपीपी अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांनी नवीन कार्ड खेळले आहे, ज्यामुळे रक्तपात होऊ शकतो. राजकारणात रक्तपात घडवून आणण्याचा इम्रान यांचा उद्देश असू शकतो, असे सांगून संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, झुल्फिकार अली भुत्तो यांची फाशी असो की, बेनझीर भुत्तो यांचे बलिदान, पीपीपीने कधीही हिंसेचे समर्थन केले नाही आणि नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पीपीपीने मोठे बलिदान दिले आहे. बेनझीर भुत्तो यांनी या संघर्षात जीव गमावला आहे. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही पीपीपीने हिंसाचाराचा मार्ग न स्वीकारता लोकशाहीचा मार्ग अंगिकारला आहे, असेही त्यांनी सांगितले.

नोव्हेंबरमध्ये रॅलीवर गोळीबार
गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या लाँग मार्चदरम्यान गोळीबार झाला होता. त्यात आपल्या उजव्या पायाला तीन गोळ्या लागल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. या हल्ल्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सरकारला जबाबदार धरले होते. आपल्या विरोधात तयार करण्यात आलेल्या योजनेनुसार हा हल्ला झाल्याचा आरोप इम्रान खान यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला होता. आपल्याला सत्तेतून खाली खेचण्यात आले, तेव्हापासूनच हे कारस्थान रचण्यास सुरुवात झाली होती, असा दावाही त्यांनी केला होता.

पोटनिवडणुकीत पीटीआय 33 जागा लढविणार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पीटीआय पक्ष मार्चमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत सर्व 33 संसदीय जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पीटीआयचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले.

First Published on: January 30, 2023 11:13 AM
Exit mobile version