National highways toll : इंधनानंतर आता टोलही महागणार; १ एप्रिलपासून लागू होणार नवे दर

National highways toll : इंधनानंतर आता टोलही महागणार; १ एप्रिलपासून लागू होणार नवे दर

केंद्राने राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसमान्यांना पेट्रोल, डिझेल गॅस आणि आता टोलच्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल टॅक्समध्ये सुधारणा करते. यंदाही टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आता १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणं महाग होणार असुन सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

केंद्राने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल टॅक्समध्ये शुक्रवार १ एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने (NHAI) टोल टॅक्समध्ये १० ते ६५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. विभागाने हलक्या वाहनांच्या किमतीत एका मार्गासाठी प्रति वाहन १० रुपये आणि व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रुपयांनी वाढ केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दिल्लीला जोडणाऱ्या महामार्गांवर कार आणि जीपचा टोल टॅक्स १० रुपयांनी वाढवला आहे. ओव्हरसाईज वाहनांच्या टोलमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक वाहनांचा टोल ६५ रुपयांनी वाढवला आहे.

५९.७७ किमी असेलल्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवरील टोल शुल्कात किमान १० टक्के वाढ होणार असल्याचं समजतं. काशी टोल प्लाझा इथं एक्स्प्रेस वेवर सराय काले खानपासून ते शेवटपर्यंत कार आणि जीप यासारख्या हलक्या-मोटार-वाहनांसाठी टोल टॅक्स १४० रुपयांऐवजी १५५ रुपये होईल. तसंच, सराय काले खान ते रसूलपूर सिक्रोड प्लाझा पर्यंतचा टोल टॅक्स १०० रुपये आणि भोजपूरसाठी १३० रुपये होईल. तर इंदिरापुरमपासून हलक्या मोटार वाहनांसाठी काशीपर्यंत १०५ रुपये, भोजपूरला ८० रुपये आणि रसूलपूर सिक्रोडपर्यंत ५५ रुपये टोल द्यावा लागेल.

दिल्ली-जयपूर हायवेवर असलेल्या खेरकी दौला टोल प्लाझावरही टोल टॅक्स वाढणार आहे. या टोलनाक्यावर १४ टक्के टोलवाढ होणार आहे. तर, कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवे (KMP) वरील टोल ९ टक्के किंवा त्याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. खेरकी दौला टोल प्लाझा व्यवस्थापनानुसार, १ एप्रिलपासून मोठ्या व्यावसायिक वाहनांना (ट्रक, बस आणि तत्सम वाहने) प्रति ट्रिप २०५ रुपयांऐवजी २३५ रुपये आकारण्यात येतील.

कार आणि जीपसाठी नियमित टोल शुल्क ७० रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढणार असून मिनीबस प्रकारच्या वाहनांसाठी १०० रुपयांऐवजी ११५ रुपये मोजावे लागणार आहेत.


हेही वाचा – इतिहासात अशी महागाई कधीच झाली नाही’, कॉंग्रेस नेते राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

 

First Published on: March 31, 2022 11:51 AM
Exit mobile version