लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान : संतापलेल्या शिखांची दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने

लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान : संतापलेल्या शिखांची दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने

नवी दिल्ली : लंडनमध्ये रविवारी (१९ मार्च) तिरंग्याचा अपमान करण्यात आला होता. याप्रकरणी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शीख समुदायातील अनेक लोकांनी आज एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील भारतीय तिरंगा खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांनी खाली पाडला होता. त्यामुळे भारतातील शीख समुदायातील लोकांनी या घटनेविरोधात ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर आज निदर्शने केली आहेत.

लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान
भारतातील ‘वारीस दे पंजाब’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या खलिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकावलेला तिरंगा रविवारी खलिस्तानी समर्थकांनी घोषणा देत खाली पाडला होता. या विरोधात आज शीख समुदायातील लोकांनी एकत्र येत दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर तिरंगा आणि फलक हातात घेऊन ‘भारत हमारा स्वाभिमान है’च्या घोषणा दिल्या आणि राष्ट्रध्वजाचा अनादर खपवून घेणार नसल्याचे सांगितले. भारतीय उच्चायुक्तालयाशी संलग्न अधिकाऱ्यांनी सांगितले की, खलिस्तानवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. आता तिरंगा भारतीय उच्यायुक्तालयावर “भव्य” स्वरूपात फडकत आहे.

ब्रिटिश उच्चायुक्तांकडून भारताने मागितले स्पष्टीकरण
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, भारतीय उच्चायुक्तालयावरील सुरक्षा कर्मचाऱ्याच्या दोन सदस्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. भारताने रविवारी रात्री ब्रिटीश उप उच्चायुक्तांना या प्रकरणाबाबत विचारले असून त्यांच्याकडून संपूर्ण सुरक्षा नसल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे.

यूके सरकारकडून भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार
परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यूकेमधील भारतीय राजनैतिक परिसर आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत यूके सरकारची उदासीनता भारताला अस्वीकार्य वाटते. यावर ब्रिटन सरकार भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेला गांभीर्याने विचार करेल, असे ब्रिटनच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी उच्चायुक्ताची तोडफोड अपमानास्पद असल्याचेही म्हटले आहे.

First Published on: March 20, 2023 8:15 PM
Exit mobile version