‘भगवान राम-सीता यांनी रावणाला हरवलं, तसं कोरोनालाही हरवू’, ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा विश्वास

‘भगवान राम-सीता यांनी रावणाला हरवलं, तसं कोरोनालाही हरवू’, ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा विश्वास

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन

भगवान राम आणि सीता यांनी ज्याप्रकारे रावणाचा पराभव केला, त्याप्रकारे आपण कोरोनाला हरवू, असा विश्वास ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे. दीपावलीच्या निमित्ताने जॉन्सन यांनी ‘आयग्लोबल दीपावली महोत्सव २०२०’ या महोत्सवाचे व्हर्च्युअली उदघाटन केले. यावेळी हिंदू समुदायाला संबोधित करत असताना त्यांनी हे उदाहरण दिले. ब्रिटनमधील लोक एकत्र येत कोरोनाचा पाडाव करतील अशा विश्वास व्यक्त करत जॉन्सन यांनी हिंदूना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना जॉन्सन म्हणाले की, “एकजुटता आणि दृढ इच्छाशक्तिच्या जोरावर आपण कोरोनाचा संसर्ग निश्चितच रोखू शकतो. दीपावलीचा सण हा अंधारावर मात करत प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याची शिकवण देतो. अज्ञानावर ज्ञानाचा विजय होतो, त्याप्रकारे आपणही कोरोनावर सहज विजय मिळवू शकतो.”

जॉन्सन पुढे म्हणाले की, रावणाचा पराभव करुन प्रभू श्रीराम आणि त्यांची पत्नी सीता घरी परतल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी दिव्यांची आरास लावण्यात आली. त्याप्रमाणेच आपणही आपला मार्ग शोधू शकतो. लॉकडाऊन असल्यामुळे ब्रिटनमध्ये यावेळची दिवाळी देखील लॉकडाऊनमध्येच साजरी करण्यात येणार आहे. दुरूनच सणाचा आनंद साजरा करणे कठीण आहे, असेही जॉन्सन यांनी सांगितले.

First Published on: November 8, 2020 8:32 PM
Exit mobile version