केवळ पंतप्रधानांची छबी देशभरात पोहोचवणारा अर्थसंकल्प; जयंत पाटलांचा टोला

केवळ पंतप्रधानांची छबी देशभरात पोहोचवणारा अर्थसंकल्प; जयंत पाटलांचा टोला

संग्रहित छायाचित्र

Union Budget 2023 : नवी दिल्ली – केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

२०२२ पर्यंत भारताची पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार अशी घोषणा २०१८ साली करण्यात आली. डेडलाईन सारखी टार्गेटची डेट हळूहळू पुढे जात आहे. पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची घोषणा केल्याप्रमाणे उद्दिष्ट्य साध्य झालेले नाही. २०१९ मध्ये २०२४ डेडलाईन केली मग २०२५ केली आणि मग २६-२७ साली पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल, अशी घोषणा केली. या घोषणांना काही अर्थ नाही. देशाचा अर्थमंत्री सभागृहासमोर सांगतो त्यावेळी ते घडायलाच पाहिजे पण घडू शकले नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सत्ताधारी भाजपने वेगवेगळ्या घोषणा केल्या. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग म्हणाले की २०३० पर्यंत भारत दहा ट्रिलियनची इकॉनॉमी बनेल. पाच ट्रिलियनपर्यंत आपण पोहोचलो नाही आणि आपण आता २०२३ सालात आहोत. हा विरोधाभास लक्षात घेतला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरकुल ही घोषणा होती. देशातील सगळ्यांना घरे देणार होते. २०२३ बजेट मांडताना भारताचे अर्थमंत्री म्हणतात अर्बन हाऊसिंग योजना आपण २०२४ पर्यंत वाढवत आहोत. खरे म्हणजे २०२४ काही होईल असे वाटत नाही. २०२६-२७ काय झाले तर पण निवडणूका आहेत म्हणून वाढ दिली आहे. घरकुलासाठी देशातील कासावीस जनता आहे. त्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पाची २०१४ – १५ मध्ये घोषणा करण्यात आली. त्यानंतर टार्गेट २०२२ ठरवण्यात आले होते. आज त्याचे काम अर्ध्यापेक्षाही कमी झाले आहे. अनेक कामे कागवरच आहेत. ही भारतातील खरी वस्तुस्थिती आहे. काश्मीर पंडितांचे पुनर्वसन व नोकर्‍या २०२२ पर्यंत देणार होते. पुनर्वसन झालेच नाही उलट त्यांचे पलायन सुरू झाले आहे अशा अलीकडे बातम्या येत आहेत. काश्मीरी पंडितांवर सिनेमा काढण्यापेक्षा त्यांना घरे देण्याचा कार्यक्रम जास्त महत्वाचा होता हे भाजपला कुणीतरी समजावून सांगितले पाहिजे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

२०२२ पर्यंत देशात बुलेट ट्रेन धावतील असे भाजपने सांगितले. मात्र जी एक आहे तिलाही सुरू व्हायला वेळ लागतोय. पण घोषणा मात्र मोठ्या आहेत. २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होणार हे वचन लोकांना बरं वाटेल यासाठीच आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, राहुल चोक्शी, दाऊद इब्राहिम, काळा पैसा यांना भारतात आणणार या सगळ्याच गोष्टी लांब राहिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बजेटची भाषणे ऐकायची आणि विसरुन जायची ही खरी आजची परिस्थिती आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

 

First Published on: February 1, 2023 8:58 PM
Exit mobile version