हाफिज सईदवरील बंदी हटवण्यास संयुक्त राष्ट्राचा नकार

हाफिज सईदवरील बंदी हटवण्यास संयुक्त राष्ट्राचा नकार

हाफिज सईद

२६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार अतिरेकी हाफिज सईदवरील बंदी हटवण्याचा अर्ज संयुक्त राष्ट्र संघाने फेटाळला आहे. या अर्जानुसार त्याची बाजू ऐकण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या पथकाचा व्हिसा जारी करण्यास पाकने नकार दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या सुनावणीचा अहवाल दिला. त्यानंतर हाफिजचा अर्ज फेटाळण्यात आला.

पथकाला व्हिसा नाकारला 

संयुक्त राष्ट्राचे पथक आणि हाफिजची भेट झाल्यास तो अतिरेक्यांच्या संघटनांबाबत जास्त माहिती देऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला होती. त्यामुळे या पथकाला व्हिसा नाकारण्यात आला. हाफिजच्या काळ्या कृत्याचे पुरावे भारताने सादर केले, ज्यात अत्यंत गोपनीय माहितीही आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ रोजी हाफिजवर बंदी घातली होती. पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याची मागणी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी केली आहे.

हाफिज सईदची धमकी खरी ठरली 

पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ‘आज तक’च्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदच्या कराची येथील रॅलीमध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड अफजल गुरुच्या नावाखाली आत्मघाती हल्लेखोरांचं पथक बनवण्याची घोषणा केली होती. आत्मघाती हल्लेखोरांची सात पथकं भारताच्या विविध शहरांमध्ये रवाना झाली, अशी घोषणा या रॅलीमध्ये करण्यात आली होती. याशिवाय रॅलीदरम्यान दहशतवादी हाफिज सईदने पंतप्रधान मोदींच्या नावाने धमकी देत, ‘मोदी तुमची फौज घेऊन काश्मारमधून परत जा’, असा इशारा दिला होता. जर फौज घेऊन काश्मीरमधून गेला नाहीत तर बरंच काही गमवावं लागेल’, अशी धमकी दिली होती.

First Published on: March 8, 2019 1:22 PM
Exit mobile version