भारताचे माजी क्रिकेटपटू आणि यूपीचे मंत्री चेतन चौहान यांचं निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि यूपीचे मंत्री चेतन चौहान यांचं निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशमधील मंत्री चेतन चौहान यांचं आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. शिवाय, त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्या नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या चेतन चौहान हे भारतीय क्रिकेट संघाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं होतं. याशिवाय ते १९९१ ते १९९८ असं दोनदा खासदारही राहिले आहेत. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ते युपी सरकारमध्ये सैन्य कल्याण, गृहरक्षक, प्रांतीय गार्ड पार्टी आणि नागरी संरक्षण मंत्री झाले. चेतन चौहान हे उत्तर प्रदेशमधील अमरोहाचे खासदारही राहिले आहेत. सध्या ते अमरोहाच्या नोगावा सादात मतदारसंघाचे आमदार होते.

चेतन चौहान-सुनील गावस्कर सलामी जोडी होती लोकप्रिय

चेतन चौहान सुनील गावस्कर यांच्याबरोबर सलामीला यायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले. गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे. चेतन चौहान डीडीसीएचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य निवडकही होते.

 

First Published on: August 16, 2020 6:18 PM
Exit mobile version