विमानात लघुशंका करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीची नोकरी गेली; कंपनीने केली कारवाई

विमानात लघुशंका करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीची नोकरी गेली; कंपनीने केली कारवाई

नवी दिल्लीः विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला कामावरुन काढले असल्याची माहिती समोर आली आहे. तो एका अमेरिकन कंपनीत उपाध्यक्ष आहे. या कंपनीने पत्रक जारी करत शर्माला कामावरुन काढल्याची माहिती दिली.

मिश्रा मुंबईचा रहिवासी आहे. तो अमेरिकन कंपनी वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष आहे. पोलिसांचे एक पथक त्याचा शोध घेत आहे. तो ज्यांच्या संपर्कात असतो, तेथे पोलिसांचे पथक गेले होते. तो तेथे सापडला नाही. त्याचा शोध सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केली. ७० वर्षीय पीडित महिलेने त्या व्यक्तिविरोधात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. शर्माचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकही स्थापन करण्यात आले आहे.

पीडित महिला एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. घडलेल्या विचित्र घटनेचा तपशील महिलेने पत्रात नमूद केला. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. त्याचवेळी एक मद्यधुंद प्रवासी सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही तो प्रवासी माझ्या जवळच उभा राहिला. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली, असे पीडित महिलेने पत्रात नमूद केले आहे.

पीडित महिलेच्या पत्राची दखल घेत या घटनेच्या चौकशीसाठी एअर इंडियाने अंतर्गत समितीही स्थापन केली आहे. तसेच, या प्रवाशाला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारसही करण्यात आल्याचे सांगितले. पोलीस तपासात लघूशंका करणारी व्यक्ती शंकर मिश्रा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याबाबत पोलिसांना अन्य माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस याचा तपास करत आहेत. शर्मा काम करत असलेल्या कंपनीनेही त्याला कामावरुन काढून टाकले आहे.

First Published on: January 6, 2023 9:41 PM
Exit mobile version