अमेरिकेने भारतासोबतची चर्चा पुन्हा टाळली पुढची तारीख अनिश्चित

अमेरिकेने भारतासोबतची चर्चा पुन्हा टाळली पुढची तारीख अनिश्चित

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

अमेरिकेने जुलैमध्ये भारतासोबत होणारी ‘२+२ चर्चा’ पुन्हा टाळली आहे. ही चर्चा ६ जुलैला वॉशिंग्टन येथे होणार होती. परंतु, काही अडचणींमुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांना ६ जुलैची चर्चा काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी ट्विट करुन सांगितले की, ‘अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी बोलून याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे’. रवीश यांनी सांगितले आहे की, ‘दोन्ही देशाच्या मंत्र्यांनी चर्चेसाठी लवकरात लवकर तारीख निश्चित करण्याचे ठरवले आहे’.

मार्चमध्येही रद्द झाली होती चर्चा

या अगोदरही मार्च महिन्यामध्ये ही चर्चा रद्द झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रीय मंत्री रेक्स टिलरसन यांना पदच्युत केले होते. त्यामुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ६ जुलैला ही चर्चा होणार होती. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि आयात-निर्यात करारावरुन संबंध काहीसे ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत ही चर्चा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, ही चर्चा रद्द होण्याचे खरे कारण अध्यापही स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांच्या भूमिकांमुळे अमेरिकेसोबत व्यापार करणाऱ्या इतर देशांमध्ये नाराजी आहे. यामध्ये अमेरिकेचे शेजारील देश कॅनडा, मेक्सिकोपासून ते ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियासारख्या देशांचा समावेश आहे.

बुधवारी संध्याकाळी अमेरिकेच्या परराष्ट्रय मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘अमेरिका आणि भारत यांच्यातील प्रशासकीय नातं दृढ राहणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांचं हेच नातं अबाधित राहावं यासाठी भविष्यामध्येही आम्ही कार करणार आहोत. त्याचबरोबर ‘२+२ चर्चे’साठी दोन्ही देशांच्या सोयीनुसार तारीख ठरवली जाईल’.

First Published on: June 28, 2018 1:05 PM
Exit mobile version