पोलिसांनी प्रियांका गांधींच्या कपड्यांना धरलं; संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत यांचे संतप्त ट्विट

पोलिसांनी प्रियांका गांधींच्या कपड्यांना धरलं; संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत यांचे संतप्त ट्विट

हाथरसच्या घटनेवरुन देशभरातून टीका झाल्यानंतर योगी सरकारने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर गांधी बहिण-भावाने पीडित कुटुंबियांची भेट घेतली. मात्र दिल्लीहून उत्तर प्रदेशला जात असताना सीमेवरच पोलिसांनी त्यांची गाडी अडवून धरली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. ही झटापट सोडविण्यासाठी प्रियांका गांधी स्वतः पोलिसांना आडव्या गेल्या. मात्र यावेळी पोलिसांनी थेट प्रियांका गांधी यांच्या मानगुटीलाच धरले. हा फोटो आता व्हायरल होत असून शिवसेनेचे नेते संजय राऊत, टराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे सचिन सावंत यांनी ट्विट करत याचा निषेध नोंदवला आहे.

आज दुपारी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरसकडे निघाले, तेव्हा प्रियांका गांधी स्वतः गाडी चालवत होत्या. मात्र युपीच्या सीमेवर त्यांना अडवून धरण्यात आले. बऱ्याच प्रयत्नानंतर गांधी यांच्यासमवेत फक्त पाच लोकांना नेण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील सोबत जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कार्याकर्त्यांमध्ये झटापट झाली. आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज होत असताना प्रियांका गांधी या स्वतः पोलिसांच्या समोर आडव्या गेल्या. यावेळी युपी पोलिसांनी प्रियांका गांधी यांच्या कपड्यांना धरून त्यांना बाजुला सारले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा फोटो ट्विट केला आहे. “ह्याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही” अशी कॅप्शनही त्यांनी फोटोला दिली आहे.

तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील हा फोटो ट्विट केला आहे. योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले की, “ये वक्त कंबख्त किसी का न था। ना किसी का रहेगा। आज तुम्हारा है। कल हमारा होगा।”

 

 

 

 

First Published on: October 3, 2020 11:22 PM
Exit mobile version