मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू, तर 12 जखमी

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू, तर 12 जखमी

Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचार कधी थांबणार? 24 तासांत 6 जणांची हत्या

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात जातीय हिंसाचारात किमान 70 लोकांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारातून मणिपूर सावरत असतानाच पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. रविवारी (28 मे) मणिपूरच्या वेगवेगळ्या भागात लोकांवर गोळीबारीच्या घटना घडल्या असून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये एका पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्यांने याबाबत रविवारी ही माहिती दिली आहे. (Violence erupts again in Manipur)

इंम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सेकमाई येथे सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केल्यामुळे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. बिष्णुपूर जिल्ह्यात, सशस्त्र कुकी अतिरेक्यांनी शनिवारी रात्री फुगकाचाओ इखाई, तोरबांग आणि कांगवाई भागात हल्ला केला आणि मेईतेई समुदायातील तीस घरे जाळली. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी इंम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांत लागू केलेली कर्फ्यूमधील 11 तासांची शिथिलता केवळ साडेसहा तासांवर आणली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने समुदायांना नि:शस्त्र करण्यासाठी शोध मोहीम सुरू केल्यानंतर मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील फयेंग येथील सुगानू येथे संशयित कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जखमी झाला आहे. याशिवाय सुगनू येथे सहा आणि सेराळमध्ये चार जण जखमी झाले.

स्थानिक ग्रामस्थांनी अतिरेक्यांना केले प्रत्युत्तर
अधिकाऱ्याने सांगितले की, काकचिंग पोलीस ठाण्यातून मेईतेई गटाने शस्त्रे लुटल्याची माहिती मिळाली आहे. काकचिंग जिल्ह्यातील नापत, सेराऊ आणि जवळच्या सुग्नूमध्ये अतिरेक्यांनी मेईतेई समुदायाच्या सुमारे 80 घरांना जाळले आणि गावकऱ्यांना मध्यरात्री पळून जाण्यास भाग पाडले. परिसरात तैनात असलेल्या राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले, त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. मणिपूर खोऱ्याच्या पूर्वेकडील भागात, सशस्त्र अतिरेक्यांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील ययांगंगपोकपी येथे हल्ला करताना दोन घरे जाळली आणि गावकऱ्यांवर गोळीबार केला. कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला स्थानिक ग्रामस्थांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी काही लोक जखमी झाल्याच्याही माहिती मिळत आहे.

सुरक्षा कर्मचार्‍यांच्या हालचालीत अडथळा आणू नये
राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग म्हणाले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केल्यापासून घरांची जाळपोळ आणि लोकांवर गोळीबार करणाऱ्या सुमारे 40 सशस्त्र अतिरेक्यांना मारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, अलीकडच्या काळात झालेल्या चकमकी समुदायांमध्ये नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये होत्या. सशस्त्र अतिरेक्यांनी एके-47, एम-16 आणि स्निपर रायफलने लोकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल या दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री सिंग यांनी लोकांना सुरक्षा कर्मचार्‍यांच्या हालचालीत अडथळा आणू नये तसेच सरकारवर विश्वास ठेवा आणि सुरक्षा दलांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आम्ही इतके दिवस त्रास सहन केला आहे आणि आम्ही कधीही राज्याचे विघटन होऊ देणार नाही. नागरिकांच्या हत्या, मालमत्तेचे नुकसान आणि घरांची जाळपोळ करणाऱ्या अनेक कुकी अतिरेक्यांना जाट रेजिमेंटने अटक केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

3 मे रोजी पहिली हिंसाचारी घटना
अनुसूचित जमाती (ST) दर्जा मिळावा या मागणीसाठी मेईतेई समुदायाने 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढल्यानंतर मणिपूरमध्ये झालेल्या जातीय संघर्षात 75 हून अधिक लोक मारले गेले होते. यानंतर आरक्षित वनजमिनीतून कुकी ग्रामस्थांना बेदखल केल्याने तणाव आधीच वाढला. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईटी  असून यापैकी बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अर्धसैनिक दलांव्यतिरिक्त, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सुमारे 140 कंपन्या, ज्यात 10,000 हून अधिक जवानांना तैनात करावे लागले होते.

First Published on: May 29, 2023 10:24 AM
Exit mobile version