ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तणाव

ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तणाव

जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण

जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईदच्या दिवशीच फूटीरतावाद्यांनी तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. श्रीनगर आणि अनंतनागमध्ये फूटीरतावाद्यांनी रस्त्यांवर जोरदार दगडफेक करत पाकिस्तान आणि आयसीसीचे झेंडे फडकवले आहेत. तर कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी ईदचे नमाज पठण करुन घरी जाणाऱ्या बीएसएफ जवानाची हत्या केली. तर आज पहाटे पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये घुसून हत्या केली आहे.

नमाज पठण करुन घरी जाणाऱ्या जवानाची हत्या

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये बीएसएफ जवान फयाज अहमद शाह ईदचे नमाज पठण करुन घरी जात होते. दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. फयाज अहमद शाह तलवाडा येथे भरती होऊन प्रशिक्षण घेत होते. बकरी ईद साजरी करण्यासाठी ते घरी आले होते.

भाजप कार्यकर्त्यांची घरात घुसून हत्या

पुलवामामध्ये आज पहाटे भाजपचे कार्यकर्ता शबीर अहमद भट यांची हत्या करण्यात आली आहे. पहाटे अडीच वाजता दहशतवाद्यांनी त्यांच्या घरामध्ये घूसून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. याप्रकरणाचा तपास पुलवामा पोलिसांकडून सुरु आहे. शबीर अहमद भट गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे कार्यकर्ते होते.

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येवर शहांनी दु:ख व्यक्त केले

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप कार्यकर्ता शबीर अहमद भट यांच्या हत्येसंदर्भात ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. भाजप कार्यकर्ते शबीर यांच्या हत्येची माहिती कळता खूप दु:ख झाले. दहशतवादी काश्मीरच्या युवकांना चांगल्या भविष्यासाठी पुढे जाण्यास रोखू शकत नाही. हिंसा करण्याचे हे चक्र खूप वेळ चालणार नाही.

सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला

फूटीरतावाद्यांनी बकरी ईदच्या दिवशी तुफान दगडफेक केली. याचीच संधी साधत दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. हासनपोरामध्ये बाईकवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या कॅम्पवर हल्ला केला. कॅम्पच्या गेटवर उपस्थित असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. मात्र त्याठिकाणावरुन दहशतवाद्यांना फरार होण्यास यश आले.

पाकिस्तान आणि आयसीसीचे झेंडे फडकावले

श्रीनगर आणि अनंतनागमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. बकरी ईदचे नमाज पठण झाल्यानंतर फूटीरतावाद्यांनी रस्त्यांवर उतरुन जोरदार दगडफेक केली. दरम्यान काही फूटीरतावाद्यांनी पाकिस्तान आणि आयसीसीचे झेंडे फडकवले आहेत. दरम्यान जवानांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.

First Published on: August 22, 2018 1:46 PM
Exit mobile version