अविश्वासदर्शक ठरावावर आज चर्चा; शिवसेना गोंधळात

अविश्वासदर्शक ठरावावर आज चर्चा; शिवसेना गोंधळात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या मुख्य चर्चेचा मुद्दा आहे तो सरकराविरोधात दाखल केलेल्या अविश्वासदर्शक ठरावाचा. पहिल्याच दिवशी तेलगु देसम पार्टीने अविश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ठराव दाखल देखील करून घेतला. त्यामुळे सर्वांचा भुवया उंचावल्या. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून आक्रमक झालेल्या टीडीपीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. याच अविश्वासदर्शक ठरावावर आज ११ वाजता चर्चेला सुरूवात होणार आहे. यावेळी विरोधकांसह भाजपच्या मित्रपक्षांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.मुख्यता शिवसेना यावेळ काय भूमिका घेते हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

शिवसेनेचे तळ्यात – मळ्यात

गुरूवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून अविश्वासदर्शक ठरावावेळी पाठिंबा देण्याची विनंती केली. उद्धव ठाकरेंनी देखील अमित शहा यांना आश्वस्त करत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिले. लगेचच पक्षातर्फे व्हिप काढत सर्व खासदारांना सभागृहामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले. शिवाय अविश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश देखील दिले गेले. त्यामुळे शिवसेनेचा भाजपवर विश्वास आहे हे स्पष्ट झाले. पण त्यानंतर दुसरा व्हिप काढला गेला. त्यामध्ये अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी व्हा असे म्हटले गेले आहे. त्यामुळे शिवसेना नक्की काय भूमिका घेणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

नाराजीमुळे टीकास्त्र

सत्तेत शिवसेनेला नेहमी दुय्यम वागणूक दिली जात असल्याने शिवसेना नाराज आहे. सामनातून त्याचे दर्शन वेळोवेळी होतच असते. आजच्या सामना संपादकीयमध्ये देखील भाजपवर टीका केली गेली आहे. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील भाजपवर होणारी टीका कायम आहे. शिवाय स्वबळाचा नारा देखील शिवसेनेचे कायम ठेवल्याने त्यांचं काय चाललंय ते त्यांनाच ठाऊक बुवा! एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे सत्तेत रहायचे या भूमिकेमुळे शिवसेना गोंधळात असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: July 20, 2018 8:58 AM
Exit mobile version