ओव्हरस्पीड कारचं वेड अन् जीवाशी खेळ! आधी सायरस मेस्त्री, आता ऋषभ पंत…

ओव्हरस्पीड कारचं वेड अन् जीवाशी खेळ! आधी सायरस मेस्त्री, आता ऋषभ पंत…

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कार अपघातामुळे आता पुन्हा एकदा ओव्हडस्पीड वाहनांमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे. ऋषभ पंत भरधाव वेगात कार चालवत होता आणि त्यात त्याला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जातेय. सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. पण ऋषभच्या कार अपघाताने उद्योगपती सायरस मिस्त्री याच्या कार अपघाताची आठवण करुन दिली आहे. ज्यात त्यांना आपला जीव गमवाला लागला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचा अपघातही अशाचप्रकारे झाला होता, त्यामुळे भारतात भरधाव कार पळवण्याचं वेड अनेकांच्या जीवावर बेतत आहे. या वेडापायी भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडतात.

ऋषभ पंत, सायरस मिस्त्री आणि प्रल्हाद मोदी यांच्या अपघातातील साम्य हे आहे की, तिघेही मर्सिडीजसारख्या आलिशान कारमधून प्रवास करत होते, जी कार प्रवासाच्या दृष्टीनेही अधिक सुरक्षित मानली जाते. मात्र यात ऋषभ पंत, सायरस मिस्त्री यांच्या कार इतक्या भरधाव वेगात होत्या की, ज्या अपघातानंतर थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळल्या. ज्यात ऋषभ पंत थोडक्यात बचावला, पण सारस मिस्त्री यांना जीव गमवाला लागला. या तिनही अपघातात मुख्यत: वाहतुकीचे नियमही काही प्रमाणात मोडण्यात आले.

30 डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. कार ओव्हरस्पीडमध्ये असताना अचानक त्याला झोप लागल्याने हा अपघात झाला. ज्यानंतर त्याची मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही ही कार रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ऋषभ पंत थोडक्यात बचावला. पंतची कार जिथे अनियंत्रित झाली, तो रस्ताही सरळ होता. मात्र अपघातावेळी ऋषभ अगदी सुसाट वेगात कार नेत होता, तसेच त्याने सीटबेल्टही लावला नव्हता, ज्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला.

याआधी 27 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा कर्नाटकातील म्हैसूरमध्ये भीषण अपघात झाला. यावेळी मर्सिडीज एसयूव्ही या कारमधून ते प्रवास करत होते. अपघातावेळी कारचा स्पीड कमी होता तरी कारवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि ती कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. या अपघातात प्रल्हाद मोदी जखमी झाले. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयही होते. तर त्यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झाला.

4 सप्टेंबर 2022 रोजी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळ झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. अपघातावेळी त्यांची मैत्रिण अनाहिता पांडोळे ही कार चालवत होती. या अपघातात त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे याचाही मृत्यू झाला. सायरस मिस्त्री मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिकमधून प्रवास करत होते. या अपघातातही वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसले. अपघातावेळी त्यांच्या कारचा वेग ताशी 89 किमी इतका होता. यावेळी  सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे मागील सीटवर बसले होते आणि त्यांनी सीट बेल्ट घातला नव्हता. तर कार चालक अनाहिता पांडोळे वाचल्या कारण त्यांनी सीटबेल्ट घातला होता.

या घटनांमध्ये 31 डिसेंबर 2022 रोजी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातही ओव्हरसीडमुळे बसच्या भीषण अपघाताची घटना समोर आली होती. ही घटना इतकी भीषण होती की, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 28 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस समोरून येणाऱ्या एसयुव्ही कारला जाऊन धडकली.

भारतात रस्त्यावर ओव्हरस्पीड कार चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र तरीही अनेक चालक आपला जीव धोक्यात घालून ओव्हरस्पीड कार चालवताना दिसतात. यामुळे भारतात या ओव्हरस्पीड कारमुळे दररोज शेकडो अपघात होतात. रस्ते अपघातात जीव गमावलेले बहुतांश लोक हे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. या अपघातामागे अपुरी झोप देखील कारणीभूत ठरतेय. जे ड्रायव्हर 5 तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांचा अपघात होण्याची सर्वाधिक शक्यता असते. दरम्यान यातील सर्वाधिक अपघात हे यात सरळ रस्त्यावर झाले आहेत.


तरुणांनी करायचं काय? बेरोजगारीचा 16 महिन्यांतील उच्चांक, ‘या’ दहा राज्यांत नोकऱ्यांची वानवा

First Published on: January 2, 2023 11:28 AM
Exit mobile version