व्हॉटसअॅपला भारतीय नियमांचे पालन करावेच लागणार- प्रसाद

व्हॉटसअॅपला भारतीय नियमांचे पालन करावेच लागणार- प्रसाद

व्हॉटसअॅप सीईओ क्रिस डॅनियल्स आणि रविशंकर प्रसाद यांनी केली व्हॉटसअॅपवर चर्चा (सौजन्य- रविशंकर प्रसाद ट्विटर)

व्हॉटसअॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पण या अॅपच्या माध्यमातून एकाचवेळी अनेकांना मेसेज चुकीचे मेसेज पाठवल्यामुळे मॉब लिंचिंगसारख्या घटना देखील घडल्या. या घटनांना आळा घालण्यासाठी यात अनेक बदल देखील करण्यात आले. पण आता व्हॉटसअॅपला भारतात टिकायचे असेल तर भारतीय नियमांचे, कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले. आज त्यांनी व्हॉटसअॅपचे सीईओ क्रिस डॅनिअल यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत व्हॉटसअॅप संदर्भात अधिक चर्चा केली.

दोघांमध्ये काय झाली चर्चा ?

गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअॅपवर फेक मेसेजेसमुळे गोंधळ झाला आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या बातमीमुळे जीव देखील गेले आहेत. हे लक्षात घेत खोट्या बातम्या, बदनामी करणारे अश्लील फोटो यांचे आदान- प्रदान कसे थांबेल. शिवाय हा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध जलद गतीने करता यावा यासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली. यावेळी त्यांनी मॉब लिंचिंगच्या घटनांचे दाखले देखील दिले.

रविशंकर यांच्या तीन मागण्या

१. देशात व्हॉटसअॅपने एक तक्रार कक्ष सुरु करावे
२. भारतीय कायदे आणि नियमांचे योग्य पालन व्हायला हवे
३. व्हॉटसअॅपचे एक मुख्यालय भारतातही असावे

देशात व्हॉटसअॅपचा अधिक वापर

देशात मेसेजिंगअॅप म्हणून व्हॉटसअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. अगदी कार्यालयीन कामासाठी ही या अॅपचा वापर होतो. पण या वापरासोबतच अनेक गैरप्रकार देखील घडले. ज्यामुळे या अॅपवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता या भेटीनंतर व्हॉटसअॅपचा सर्वेसर्वा नेमके काय बदल करणार ? हे पाहावे लागेल.

व्हॉटसअॅपने केले बदल

मॉब लिंचिंगनंतर व्हॉटसअॅपने अनेक बदल केले. ग्रुपमध्ये पाठलेला मेसेज जर फॉरवर्डेड असेल तर आता मेसेजवर ते लिहून येते. शिवाय आता एका वेळी फक्त ५ जणांना एखादा मेसेज पाठवता येतो. या मागे मेसेज एकाचवेळी अनेकांना पसरु नये असा हेतू होता.

First Published on: August 21, 2018 4:13 PM
Exit mobile version