जेव्हा राहुल गांधी हे मोदींच्या भाषणाची नक्कल करतात

जेव्हा राहुल गांधी हे मोदींच्या भाषणाची नक्कल करतात

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा सध्या मध्य प्रदेश राज्यात दौरा सुरु आहे. आज भोपाल येथील जाहीर सभेला संबोधित करत असताना गांधी यांनी मोदींच्या भाषणाची नक्कल करुन दाखवली आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मोठ्या उत्साहात भाषण देत होते, असे सांगतना राहुल गांधी यांनी मोदी यांची नक्कल करुन दाखवली. ‘मी ५६ इंच छातीचा असून चौकीदार आहे. मी भ्रष्टाचाराला संपवेल’. त्यानंतर थोडावेळ थांबून राहुल गांधी आता कसे भाषण देतात याची नक्कल करुन दाखविताना मान आणि छाती झुकवून म्हणतात, ‘मी काँग्रेस पक्षाचा नायनाट करणार’ .

यानंतर राहुल गांधी नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. “तुम्ही काँग्रेसला संपवणार म्हणता. पण कुठे संपवले. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. आता दिल्लीतही काँग्रेस येणार. त्यानंतर आम्ही लोकसभाही जिंकू.”

दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि इतर काँग्रेसी नेत्यांची नक्कल करुन दाखवली होती. त्यानंतर आता राहुल गांधी देखील नकलाकार बनून मोदींना सव्याज परतफेड करत आहेत.

मोदी यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत दिली असल्याचा देखावा केला, असाही आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, “बजेट सादर करत असताना भाजपचे खासदार अचानक पाच मिनिटे बेंच वाजवत होते. मला वाटले मोदीजींनी काहीतरी मोठी घोषणा केली. त्यानंतर मला कळाले की मोदींनी शेतकऱ्यांना रोज १७ रुपये. देण्याची घोषणा केली. फक्त १७ रुपये!” एका वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असल्याची प्रतिक्रियाही यावेळी गांधी यांनी दिली.

First Published on: February 8, 2019 9:52 PM
Exit mobile version