WHO नं जगभरातल्या सरकारांना Corona वरून फटकारलं!

WHO नं जगभरातल्या सरकारांना Corona वरून फटकारलं!

एकीकडे जागतिक स्तरावर चीनसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून आणि वारंवार बदलणाऱ्या अंदाजांवरून WHO ला लक्ष्य केलं जात असताना आता डब्ल्यूएचओनंच जगातल्या अनेक राष्ट्रांच्या सरकारांवर टीका केली आहे. ‘जगभरातली सरकारं कोरोनासंदर्भात वेगवेगळे संदेश देत आहेत, वेगवेगळे दावे करत आहे आणि त्यामुळे लोकांचा सरकारांवरचा विश्वास उडत चालला आहे’, अशी टीका जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहेनम घेब्रियेसुस यांनी केली आहे. ‘कोरोनाच्या महामारीला आवर घालण्यात अपयश येणं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात आपण जगात सामान्य परिस्थिती प्रस्थापित करू शकणार नाही’, असं देखील टेड्रोस यांनी म्हटलं आहे. मात्र, टीका करताना त्यांनी कोणत्याही देशाचं किंवा राष्ट्रप्रमुखांचं नाव घेतलेलं नाही.

जनतेचा सरकारवर विश्वास आवश्यक

पत्रकारांशी संवाद साधताना टेड्रोस (Who Chief Tedros) म्हणाले की ‘जगातले अनेक देश कोरोनाशी लढा देताना चुकीच्या उपाययोजना करत असून चुकीच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना कोरोनाचा फैलाव रोखण्यात पुरेशा ठरत नाहीये. अनेक देश चुकीची पावलं उचलत आहेत. कोरोनाशी लढा देताना जनतेचा आपल्या सरकारवर विश्वास असणं गरजेचं आहे. मात्र, सरकारांनी घेतलेल्या अशा निर्णयांमुळे जनतेचा सरकारवरचा विश्वास घटू लागला आहे’.

दरम्यान, कोरोनाशी लढा देणं हे सोपं काम नसल्याचं देखील टेड्रोस यांनी मान्य केलं आहे. ‘लॉकडाऊन लागू केल्याचे अनेक आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम देखील होत आहेत. सध्या कोरोना हा जनतेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू झाला आहे. पण अनेक देशांतली जनता ही बाब गांभीर्याने घेत नाही’, असं ते म्हणाले.

गेल्या २४ तासांमध्ये जगभरात तब्बल २ लाख ३० हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण (World Corona Patient) सापडले आहेत. त्यातले ८० टक्के रुग्ण जगातल्या फक्त १० देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळेच या देशांमध्ये होणारा कम्युनिटी ट्रान्समिशन थांबवण्यासाठी देशांतर्गत परिस्थितीनुसार निर्णय घेणं आवश्यक असल्याचं WHOकडून सांगण्यात आलं आहे.

First Published on: July 14, 2020 5:13 PM
Exit mobile version