Siddaramaiah or DK Shivakumar कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? आज दिल्लीत काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय

Siddaramaiah or DK Shivakumar कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? आज दिल्लीत काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर डी.के.शिवकुमार यांच्यासाठी विशेष केक मागवण्यात आला.

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी रविवारी उशिरापर्यंत विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे तीन निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया, भंवर जितेंद्रसिंह आज (सोमवार) दिल्लीला रवाना होतील. निरीक्षकांनी बंगळुरुच्या शांगरीला हॉटेलमध्ये आमदारांशी प्रत्यक्ष बातचीत केली आणि त्यांचे मत जाणून घेतले. आज दिल्लीत काँग्रेस हायकमांड कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यासंबंधी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या गळ्यात पडते की प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या गळ्यात पडते याची त्यांच्या समर्थकांसह सर्वच वाट पाहात आहे. सिद्धरमैय्या आज पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. डी.के.शिवकुमार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाण्याची शक्यता कमी आहे.

डी.के.शिवकुमार यांनी आज त्यांच्या समर्थकांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘आज माझा जन्मदिवस आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटीसाठी येत आहेत. पूजा अर्चनाही करायची आहे. त्यामुळे सध्याच दिल्लीला जाण्याचा विचार नाही. निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पार पाडली आहे. माझे काम मी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त हायकमांड काय भेट देणार हे मला माहित नाही. कर्नाटकच्या जनतेने तर आधीच सर्वात मोठी भेट दिली आहे.’

विधीमंडळ पक्षाची बैठक रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सिद्धरमैय्या आणि डी.के.शिवकुमार देखील उपस्थित होते. सिद्धरमैय्या यांनी मुख्यमंत्री निवडीचे अधिकार पक्षाध्यक्ष खर्गे करतील असा प्रस्ताव मांडला. डी.के.शिवकुमार यांच्यासह सर्व आमदारांनी एकमताने प्रस्तावाचे समर्थन केले. हॉटेलमध्ये बैठक सुरु असताना बाहेर डीके आणि सिद्धरमैय्या समर्थकांची घोषणाबाजी सुरु होती.

बैठकीनंतर डी.के.शिवकुमार यांच्यासाठी विशेष केक मागवण्यात आला. ते म्हणाले काँग्रेसला मिळालेला एवढामोठा विजय हिच माझ्यासाठी मोठी भेट आहे.

First Published on: May 15, 2023 12:36 PM
Exit mobile version