100 crore COVID-19 vaccines: WHO ने केले भारताचे कौतुक, हे श्रेय…

कोरोनाच्या महामारीच्या संकटात भारताने आज नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताने आज लसीकरणाच्या अभियानाअंतर्गत १०० कोटींचा कोरोनाविरोधी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. तब्बल १०० कोटी डोसच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करणारा असा भारत देश जगभरातील दुसरा देश ठरला आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी जागतिक आरोद्य संघटना (WHO) ने भारताचे कौतुक केले आहे. डब्ल्यूएचओच्या दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय निदेशकपदी असणाऱ्या डॉ पूनम खेत्रपाल सिंह यांनी भारतीयांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताने १०० कोटी लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण केले आहे, भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीत हा मैलाचा दगड ठरला असल्याचेही त्या म्हणाल्या.

भारतीयांच्या लसीकरणाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की अतिशय कमी वेळात मजबूत अशा राजकीय नेतृत्वात, आंतर क्षेत्रीय अभिसरणाच्या प्रक्रियेतून तसेच फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाच्या वेगाशिवाय हा टप्पा गाठणे शक्य झाले नसते. भारतातील संपुर्ण प्रगतीला एकप्रकारे लसीकरणाच्या मोहिमेतील उदिष्टपूर्तीचे यश म्हणून पाहिले जाणे गरजेचे आहे. तसेच जागतिक पातळीवर या जीव रक्षक अशा लसीकरणाच्या उपलब्धततेसाठीचा प्रयत्न केला जाणे गरजेचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील ७५ टक्के नागरिकांना घेतला पहिला डोस

प्रौढ नागरिकांमध्ये देशातील ७५ टक्के नागरिकांनी लसीकरणाच्या मोहिमेअंतर्गत लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर जवळपास ३१ टक्के लोकसंख्येने लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत फक्त चीनला लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार करणे शक्य झाले आहे. त्यापाठोपाठ आता भारतही १०० कोटींचा आकडा पार करणारा देश ठरला आहे. संपुर्ण राष्ट्रव्यापी अशा लसीकरणाच्या मोहिमेत भारताने सातत्याने लसीकरणाच्या कार्यक्रमात प्रगती केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक आकडा म्हणजे ऑगस्ट महिन्यात १ कोटींचा टप्पा पार करणे शक्य झाले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी हा आकडा अडीच कोटींवर पोहचला होता.

लसीकरणाचे सेलिब्रेशन

भारतात १०० कोटी लसीकरणाच्या निमित्ताने अनेक पद्धतीने सेलिब्रेशन केले जाणार आहे. त्यामध्ये देशात १०० कोटी जनतेला लस उपलब्ध झाल्याच्या निमित्ताने आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लाल किल्ल्यावरून कैलास खेरच्या आवाजातील ऑडिओ व्हिज्युअल फिल्म प्रदर्शित केली. मांडविया यांनी ट्विट करत म्हटले आहे की ज्यांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे, अशा नागरिकांनी लगेचच लस घ्यावी. तसेच लसीकरणाच्या मोहिमेत आपले योगदान द्यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.


हेही वाचा – Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला

First Published on: October 21, 2021 11:43 AM
Exit mobile version