राज्यपालपदासाठी ३ नावे चर्चेत

राज्यपालपदासाठी ३ नावे चर्चेत

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समोर आल्यापासून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असतील, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच भाजपवासी झालेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, भाजपच्या मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन राज्यपालपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.

अमरिंदर सिंग यांचा अलीकडेच भाजपच्या ८३ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २९ जानेवारीला पटियाला येथे सभा होणार होती. या रॅलीच्या माध्यमातून अमरिंदर सिंग आपली ताकद दाखवणार होते, परंतु रॅलीची तयारी पूर्ण झाल्यानंतरही अचानक ही रॅली पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांना राज्यपालपद देण्याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या.

सप्टेंबर २०१९ मध्ये राज्यपालपदी विराजमान झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातील कारकीर्द ही वादग्रस्तच राहिली आहे. कधी महापुरुषांचा अवमान तर कधी मुंबईकरांची अवहेलना या मुद्यावरून कोश्यारी विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले, मात्र मविआने सादर केलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी प्रलंबित ठेवण्यापासून ते शिंदे यांच्या बंडानंतर भाजपच्या सत्तास्थापनेत कोश्यारींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून दिली होती. तरीही राज्यपालांना हटवण्यात येत नसल्याने भाजपने महापुरुषांचा अवमान करणार्‍या कोश्यारींना जाणीवपूर्वक पदावर ठेवले असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच ३१ जानेवारीपासून सुरू होणार्‍या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणाचे पारडे जड?
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबच्या राजकारणातील मोठे नाव आहे. अमरिंदर सिंग यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजा होते, तर ते स्वत: १९६३ ते १९६६ या काळात भारतीय लष्करात होते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस हायकमांडची खप्पामर्जी झाल्याने अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबर २०२१ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत स्वत: पंजाब लोक काँग्रेस नावाचा पक्ष काढला आणि काही महिन्यांमध्ये तो सप्टेंबर २०२२ मध्ये भाजपात विलीन केला.

यापूर्वी उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नावही चर्चेत आले होते, मात्र नंतर भाजपने या पदासाठी जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग परदेशात उपचार घेत होते. तोपर्यंत त्यांनी आपला पक्षही वेगळा ठेवला होता, मात्र आता कॅप्टन अमरिंदर सिंग थेट भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, भाजपच्या मध्य प्रदेशातील वरिष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे नावही राज्यपालपदासाठी शर्यतीत आहे.

First Published on: January 28, 2023 4:44 AM
Exit mobile version