…आणि पतीचे अंत्यसंस्कार केले पण, पत्नीविना

…आणि पतीचे अंत्यसंस्कार केले पण, पत्नीविना

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र, हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तेलंगणात एक दु:खद घटना घडली आहे. चंद्रपुरातील सावली तालुक्यातील खेडी या गावी एका पत्नीला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराला पोहचता आले नाही.

नेमके काय घडले?

पती – पत्नीचे नाते हे सात जन्माचे मानले जाते. काही झाले तरी शेवटच्या क्षणी कुठेही पत्नी असली तरी देखील तिला पतीच्या अंत्यसंस्काराकरता आणलेच जाते. कारण पत्नीशिवाय अंत्यसंस्कार होतच नाहीत. मात्र, तेलंगणात अडकून पडलेल्या मिरची तोड मजुराची पत्नी पतीच्या अंत्यदर्शनासाठीही पोहचू शकली नाही.

मूळचे मूल तालुक्यातील बोरचांदली येथील रुपेश रामटेके याचा १२ वर्षांपूर्वी खेडी येथील कविता भडके हिच्याशी विवाह झाला. परंतु, पतीचे आरोग्य साथ देत नसल्याने तो सारखा आजारी पडायचा. त्यामुळे स्वत:ची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कवितावर होती. त्यामुळे ती आपल्या १० वर्षाच्या मुलाला घेऊन आपला उदनिर्वाह करत होती. ही माऊली कधी बोरचांदली तर कधी खेडी येथे मजुरी करण्यासाठी जायची. त्याचप्रमाणे ती मिरची तोडण्याच्या कामासाठी तेलंगण या राज्यात आपल्या पतीला आणि मुलाला खेडी येथे ठेऊन गेली होती.

दरम्यान, कविताच्या पतीची अचानक तब्येत खालावली त्यामुळे त्याला सर्वप्रथम ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिकच खालवल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा त्यात मृत्यू झाला. याबाबत कविताला माहिती देण्यात आली. परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे तिला येता आले नाही. त्यामुळे शेवटी पतीवर अंतिम संस्कार पत्नीशिवाय करण्यात आले.


हेही वाचा – ‘या’ टेलरला सलाम; दिव्यांग असूनही दिवसरात्र एक करून शिवले मास्क


 

First Published on: April 3, 2020 10:22 PM
Exit mobile version