मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून राज्यसभेवर जाणार नितीश कुमार?, उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा

मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून राज्यसभेवर जाणार नितीश कुमार?, उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा

पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आता राज्यसभेवर जाण्याचे वेध लागले आहेत. मी कधी तरी राज्यसभेवर नक्कीच जाईल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. नितीश कुमार हे राज्यसभेवर गेल्यास बिहारचे इतर दोन दिग्गज नेते लालूप्रसाद यादव आणि सुशील कुमार यांची ते बरोबरी करू शकणार आहेत. लालूप्रसाद यादव आणि सुशील कुमार हे दोन्ही नेते संसद आणि विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत.

नितीश कुमार नव्या भूमिकेच्या प्रतीक्षेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेच्या आपल्या कार्यकeळात पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले की, ते कधी ना कधी तरी राज्यसभेवर जाऊ इच्छितात. नितीश कुमार आतापर्यंत बिहार विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 16 वर्ष बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या नितीश कुमारांच्या या इच्छेमुळे ते स्वतःला कोणत्या तरी नव्या भूमिकेत पाहू इच्छितात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळेच नितीश यांच्या विधानाचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीशी आता संबंध जोडला जात आहे.

जुन्या लोकसभा मतदारसंघाला भेट दिली असता नितीश यांना काहींनी प्रश्न विचारण्यात आले. आजकाल तुम्ही तुमच्या जुन्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत, तेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही पुन्हा एकदा नालंदामधून उमेदवार होऊ शकता का? यावर ते म्हणाले की, असे काही नाही आणि हा दौरा 2019 पासून प्रस्तावित होता, मात्र गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे तो शक्य झाला नाही. राज्यसभेवर जाणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, तशी इच्छा आहे, मात्र तूर्तास पक्षाची आणि कामांची जबाबदारी आहे.


हेही वाचाः Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी ठरतायत डोकेदुखी

First Published on: March 31, 2022 8:33 AM
Exit mobile version