आता उमा भारतींची देखील २०१९च्या मैदानातून माघार

आता उमा भारतींची देखील २०१९च्या मैदानातून माघार

केंद्रीय मंत्री उमा भारती

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी देखील २०१९ची लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. यापुढील दीड वर्ष आपण केवळ गंगा स्वच्छता आणि अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं भारती यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी बोलताना उमा भारती यांनी २०१६ साली माझी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी राजीनाम्याबाबत चर्चा झाली होती. पण, त्यांनी त्यावेळी मला रोखलं होतं. त्यामुळे पुढचा निर्णय देखील माझा पक्षावर अवलंबून असेल असं म्हटलं आहे. दरम्यान, पुढील दीड वर्ष आपण गंगा स्वच्छता आणि राम मंदिराच्या उभारणीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. त्यामध्ये फायदा आणि तोट्याचा विचार केला जाणार नाही. तसेच राम मंदिराचा मुद्दा हा आंदोलनं करून नाही तर चर्चा करून सोडवायला हवा असं देखील उमा भारती यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश आणायचा झाल्यास काँग्रेसला देखील पाठिंबा द्यावा लागेल. काँग्रेसनं जबाबदारीनं वागावं. कारण, त्यांनी राम मंदिरावरून वातावरण गढूळ केल्याचा आरोप केला यावेळी उमा भारती यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे १९९२ साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी उमा भारती या लालकृष्ण अडवाणी यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या.

यापूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील प्रकृती अस्वास्थाचं कारण पुढे करत २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देखील २०१९ची निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटल आहे.

वाचा – लोकसभा २०१९ लढवणार नाही – सुषमा स्वराज

First Published on: December 4, 2018 8:14 PM
Exit mobile version