“फक्त हिंदुंसाठी काम करा!” भाजप आमदाराची मुक्ताफळे

“फक्त हिंदुंसाठी काम करा!” भाजप आमदाराची मुक्ताफळे

भाजप आमदार बसुगौंडा पाटील ( फोटो सौजन्य - हिंदुस्तान टाईम्स )

“फक्त हिंदुंच्या भल्यासाठी काम करा” अशी मुक्ताफळे कर्नाटकातल्या भाजप आमदाराने उधळली आहेत. बसुगौंडा पाटील-यतील असे या भाजप आमदाराचे नाव असून पाटील हे विजापूरचे आमदार आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “केवळ हिंदुंच्या भल्यासाठी, विकासासाठी काम करा, हिंदुंनीच आपल्याला मते दिली आहेत”, असे भाजप आमदार बसुगौंडा पाटील-यतील यांनी म्हटले आहे. तसा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र व्हिडिओ नक्की केव्हाचा आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भाजप आमदाराने उधळली मुक्ताफळे

“मी मुस्लिमांकडे मते मागायला केव्हाच गेलो नव्हतो. मला विश्वास आहे हिंदुंनीच मला मतदान केले आहे. मला हिंदुंनीच निवडून आणले आहे. म्हणून मी हिंदुंच्या भल्यासाठी आणि विकासासाठी काम करणार आहे,” असे पाटील म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कर्नाटकातल्या अनेक भागांत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नगरसेवकांना देखील त्यांनी केवळ हिंदुंच्या भल्यासाठी आणि विकासाठी काम करण्यास सांगितले आहे. हिंदुंनीच आपल्याला सत्तेत आणले असल्याचे पाटील म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.

“माझ्या ऑफिसमध्ये स्कल कॅप आणि बुरखा घालून येण्यास परवानगी नाही,” असे देखील आमदार बसुगौंडा पाटील-यतील यांनी म्हटले आहे. शिवाय, “स्कल कॅप आणि बुरखा घातलेल्या मुस्लिम व्यक्तीला मी ऑफिस किंवा माझ्या बाजूला देखील उभे राहू देत नाही”, असे देखील पाटील यांनी नगरसेवकांना सांगितले आहे.

विधानाचे समर्थन

वादग्रस्त विधान केल्यानंतर पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाहीये. वादग्रस्त विधानाबद्दल विचारले असता “हिंदुंच्या बाजूने बोलण्यात गैर काय?” असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय “कर्नाटकातील निवडणूक ही हिंदू आणि मुस्लिमांमधील युद्ध होते,” अशी पुष्टीही पाटील यांनी जोडली.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ केव्हाचा आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या पोस्टरवर हा वादग्रस्त व्हिडिओ शिवजयंतीच्या दिवशीचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. व्हिडिओमध्ये शिवजयंतीचे पोस्टर दिसत आहे.

वादग्रस्त विधानांची मालिका

वादग्रस्त विधाने आणि भाजप नेते हे समीकरण काही नवीन नाही. यापूर्वी देखील सीता ही भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबी असल्याचे विधान उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेशकुमार शर्मा यांनी केले होते. त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता. शिवाय, महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होते असे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलव कुमार देब यांनी म्हटले होते. .त्यात आता बसुगौंडा पाटील यांच्या  नावाची भर पडली आहे. बसुगौेडा पाटील यांच्या या व्हिडिओवर भाजपकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

First Published on: June 8, 2018 6:24 AM
Exit mobile version