भारतातील पहिली नोजल कोविड लस 26 जानेवारीला होणार लॉन्च

भारतातील पहिली नोजल कोविड लस 26 जानेवारीला होणार लॉन्च

भारत बायोटेक निर्मित ‘इन्कोव्हॅक’ नोजल कोविड लस देशभरातील नागरिकांना येत्या 26 जानेवारीपासून दिली जाणार आहे. ‘इन्कोव्हॅक’ लस ही भारतातील पहिली नोजल कोविड लस आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यामुळे आता वाढत्या कोरोनाला आळा घालणे शक्य होणार आहे. (world first and made in India covid nasal vaccine will be launched on 26 January)

भोपाळमधील मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MANIT) येथे फेस टू फेस विथ न्यू फ्रंटियर्स इन सायन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृष्णा इला सहभागी झाले होते. त्यावेळी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “गुरांना त्वचेच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी देशी बनावटीची लंपी प्रोव्हाकिंड लस पुढील महिन्यात लाँच केली जाईल. आमची नोजल कोविड लस 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लाँच केली जाणार आहे”, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारत बायोटेकने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की ते इंट्रानाझल लस विकणार आहेत. प्रति डोस 325 रुपये सरकारी, तर खासगी लसीकरण केंद्रांसाठी प्रति डोस 800 रुपये मोजावे लागणार आहेत.

जगभरात 2020 साली कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातले होते. त्यामुळे जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. त्यावेळी लसीकरण हाच कोरोनावरील जालीम उपाय समजला जात होता. त्यामुळे अनेक देशांनी कोविड लस बनवण्यावर भर दिला आहे.

iNCOVACC ही जगभरातील पहिली इंट्रानासल लस बनली आहे. भारत बायोटेकच्या पहिल्या नोजल कोविड लसीला याआधीच मंजूरी देण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या सुई रहित इंट्रानेजल कोविड व्हॅक्सीनला 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षतेसाठी या व्हॅक्सीनला मंजूरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हेटरोलोगस बूस्टर म्हणजे कोविडशील्ड किंवा कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही विशेष इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून देता येणार आहे.


हेही वाचा – केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात – मी शाळेत गणित, मराठी विषयांत टॉपर होतो…

First Published on: January 22, 2023 6:02 PM
Exit mobile version