लखनऊ महोत्सवात खपतोय ‘योगी आंबा’!

लखनऊ महोत्सवात खपतोय ‘योगी आंबा’!

लखनऊ आंबा महोत्सव

सध्या उत्तर प्रदेशच्या ‘लखनऊ आंबा महोत्सव’च्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांचे कारणही तितकेच खास आहे. या महोत्सवातील ‘योगी आंबा’ हा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. महोत्सवाच्या प्रदर्शनातील आंब्याच्या एका प्रजातीचे नाव ‘योगी’ असल्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील चर्चेत आले आहेत. लखनऊमध्ये आंबा महोत्सवाच्या या परंपरेला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. शुक्रवारी सहाव्या आंबा महोत्सवाला शुभारंभ झाला. या आंबा महोत्सावात सुमारे ७०० विविध प्रजातींचे आंबे प्रदर्शनास ठेवण्यात आले होते.

आकर्षणाचे कारण केशरी रंग

मुझफ्फरनगरचे ए. सी. पाठक यांनी ए.एन.आय. या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले की, ‘तारिख मुस्तफा यांनी त्यांच्या शेतामध्ये ‘योगी आंबा’ या प्रजातीच्या आंब्याचे पीक घेतले आहे. या प्रजातीतील आंबा हा आकाराने गोलाकार आणि लहान आहे. आंब्याचा केशरी रंग हाच पर्यटकांना आकर्षित करण्याचे कारण ठरत आहे. तारीख मुस्तफा यांच्या शेतात सुमारे १०० विविध प्रकारच्या प्रजातींचे आंबे आहेत. शिवाय, या महोत्सवात मुझफ्फरनगरच्या ६० वेगवेगळ्या आंब्यांच्या प्रजाती आहेत.’ पाठक यांनी पुढील ३ ते ४ वर्षांत ‘योगी आंबा’ बाजारात येण्याची शक्यता वर्तवली आहे.

आंब्यांच्या चवीने लहान मुलांना भुरळ पाडली

‘अवध आम उत्पादक बागवानी समिती’चे सरचिटणीस उपेन कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘हा महोत्सव एक विशेष ‘आंबा महोत्सव’ आहे. लोकांनी इथे विविध प्रकारचे आंबे बघितले. इथे जवळ जवळ ७८० विविध प्रजातींचे आंबे आहेत. या महोत्सवाला आलेल्या सगळ्याच लहान मुलांनाही आंब्याच्या चवीने भुरळ पाडली होती’. त्याचबरोबर आंबे खाल्ल्याने मधुमेहाचा त्रासही कमी होत असल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.

First Published on: June 24, 2018 7:11 PM
Exit mobile version