तुम्ही जिंकलात, मी हरलो – कसाब

तुम्ही जिंकलात, मी हरलो – कसाब

अजमल कसाब

२००८ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला. या हल्ल्यातील एकमेव जिंवत पकडलेल्या आरोपीला अर्थात २१ वर्षाच्या अजमल कसाबला नोव्हेंबर २०१२ साली फासावर लटकवलं गेलं. फासावर जाण्यापूर्वी अजमल कसाबनं तुम्ही जिंकलात मी हरलो अशी कबुली दिल्याची माहिती सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर रमेश महाले यांनी दिली आहे. रमेश महाले हे पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला २६ नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमिवर हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कसाब हा लष्कर – ए – तैयबाचा दहशतवादी होता. भारताविरोधात युद्ध पुकारण्याच्या आरोपासह ८० गुन्ह्यांखाली त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. कसाबला फासावर लटकवण्याच्या दोन दिवसापूर्वी रमेश महाले यांनी पुण्यातील येरवडा जेलमध्ये कसाबची भेट घेतली होती. त्यावेळी कसाबनं ‘आप जित गऐ, मै हार’ गया अशी कबुल दिल्याचं रमेश महाले यांनी सांगितलं.

२६/११ चा दहशतवादी हल्ला

समुद्रामार्गे मुंबईमध्ये आलेल्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशनसह, कामा रूग्णालय, लिओपोर्ड कॅफे, गिरगाव चौपाटी, ताज हॉस्पिटलवर बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये १६४ लोकांना आपला जीव गमवावा लागला तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. पण, तुकाराम ओबळेंनी मात्र प्राणांची बाजी लावत अजमल कसाबला जिवंत पकडलं. त्यानंतर त्याची नायर रूग्णालयामध्ये चौकशी करताना रमेश महाले देखील हजर होते. जवळपास ४ वर्षानंतर कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण आपल्याला फासावर लटकवण्यात येणार नाही असा विश्वास कसाबला होता. वेळोवेळी कसाब ही बाब बोलून देखील दाखवायचा. त्यासाठी तो सतत संसद हल्ल्यावरील गुन्हेगार अफजल गुरूचं उदाहरण द्यायचा. चौकशी दरम्यान कसाब ही बाब सतत रमेश महाले यांना बोलून देखील दाखवायचा. शिवाय, चौकशीवेळी तो नेहमी तुच्छतेनं उत्तरं द्यायचा अशी माहिती देखील महाले यांनी सांगितली. पण ज्यावेळी कसाबला फासावर लटवण्याचा निर्णय झाला. त्याच्या दोन दिवस अगोदर रमेश महाले यांनी येरवडामध्ये कसाबची भेट घेतली. त्यावेळी मात्र कसाबनं तुम्ही जिंकलात, मी हरलो अशी कबुली दिल्याचं महाले सांगतात.

First Published on: November 12, 2018 1:23 PM
Exit mobile version