भोपाळमध्ये माथेफिरुने मुंबईच्या मॉडेलला बनवले बंदी

भोपाळमध्ये माथेफिरुने मुंबईच्या मॉडेलला बनवले बंदी

भोपाळमध्ये मॉडेलला बनवले बंदी

भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरुने मुंबईच्या मॉडेलला बंदी बनवले आहे. भोपाळच्या मिसरोद भागामध्ये राहणाऱ्या या तरुणीच्या घरामध्येच तिला बंदी बनवण्यात आले आहे. रोहित सिंह असं या माथेफिरुचे नाव आहे. त्यांने या तरुणीला एका रुममध्ये बंदी बनवून ठेवले आहे. या मॉडेलच्या सुटकेसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. दरम्यान पोलीस या तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

लग्नाला नकार दिल्याने उचलले पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, माथेफिरु तरुण या मॉडेलला आधीपासून ओळखत होता. या तरुणीवर तो लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्यांने शेवटी तिला बंदी बनवले. त्याने तिच्यावर कैचीने वार करुन जखमी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या माथेफिरुने एक व्हिडिओ वायरल केला आहे. त्यामध्ये तो तिच्यावर प्रेम करत असल्याचे म्हटले आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याचा हा परिणाम आहे असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सकाळी ७ पासून तरुणीला केले बंदी

सकाळी ७ वाजल्यापासून त्याने या मॉडेलला बंदी बनवले आहे. ज्या बिल्डिंगमध्ये ही तरुणी राहते त्याच घरात त्याने तिला बंदी बनवले आहे. मिसरोद भागामध्ये ही तरुणी राहते. हा माथेफिरु स्वत:ला गोळी मारण्याची धमकी देत आहे. पीडित तरुणीने एमटेकचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईमध्ये मॉडलिंगचे काम करते. ही तरुणी बीएसएनएलच्या निवृत्त अधिकाऱ्याची मुलगी आहे.

माथेफिरुने पोलिसावर देखील केला हल्ला

घटनास्थळावर पोलिसांना पाहून या माथेफिरुने या तरुणीला मारण्याची धमकी दिली आहे. या माथेफिरुशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या मिसरोद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गोविंद सिंह राजपूतवर त्याने हल्ला केला. या माथेफिरुजवळ चाकू आहे. तो या तरुणीला काही इजा पोहचवू नये यासाठी पोलीस थोडी सावधानता बाळगत आहेत.

माथेफिरु मुंबईत करतो मॉडेलिंग

रोहित सिंह असं या माथेफिरु तरणाचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या अलिगढचा रहिवासी आहे. याआधी देखील त्याने अशाप्रकारचे वर्तन केले आहे. हा तरुण देखील मुंबईमध्ये मॉडलिंग करतो. माथेफिरु तरुण आणि पीडित तरुणी हे दोघे एकमेकांना ओळखतात. एप्रिल महिन्यामध्ये मिसरोद पोलिसांनी या तरुणाला एका प्रकरणात अटक सुध्दा केली होती. या तरुणाचे काका उत्तरप्रदेशमध्ये पोलीस आहे.

First Published on: July 13, 2018 4:07 PM
Exit mobile version