अनागोंदीची होळी होईल का?

अनागोंदीची होळी होईल का?

संपादकीय

सध्या महाराष्ट्राचे राजकारण एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे, राजकारण म्हटले की, सत्तास्पर्धा ही आलीच, त्यात मग सत्ताधारी आणि विरोधक या दोन बाजू लोकशाहीमध्ये ओघाने आल्याच. लोकशाहीच्या रक्षणासाठी सक्षम विरोधी पक्ष असणे आवश्यक असतो. नाही तर एकाच पक्षाची मक्तेदारी आणि मनमानी सुरू होईल. त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल. सत्ताधार्‍यांच्या कामकाजातील दोष दाखवून देेणे हे विरोधी पक्षाचे मुख्य काम असते, पण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पातळी राखण्याची आवश्यकता असते. ती जर राखली नाही तर राजकीय नेत्यांचे लोकांसमोर हसे होते. अशा नेत्यांची लोक चेष्टा करू लागतात. सत्ता येते आणि जाते, पण आपण प्रतिस्पर्ध्यावर आरोप करताना जेव्हा पातळी सोडतो, तेव्हा आपण एकूणच राजकारणाचा स्तर खाली नेत आहोत, त्यामुळे आपल्यासोबतच लोकशाही या शासकीय प्रणालीचे अवमूल्यन आपल्या तोंडून होत आहे, हे खरे तर लक्षात घेण्याची गरज आहे, पण सध्या महाराष्ट्रात राजकीय पक्षांची इतकी शकले पडली आहेत की, त्यामुळे राज्यातील राजकारणाला शिवपूर्व काळातील वतनदारीचे स्वरुप आलेले आहेत.

इथे प्रत्येकजण स्वत:ला राजा समजत आहेत, त्यामुळे कुणीच कुणाला जुमानत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याला एक मुख्य कारण म्हणजे या वतनदारांची अतिशय मजबूत असलेली आर्थिक स्थिती. पूर्वी राजकारणात जे स्ट्रगलर्स होते, ते आता गेल्या काही वर्षांमध्ये चांगलेच प्रस्थापित झालेले आहेत. त्यामुळे सत्तेत असो किंवा नसो, त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत. माणूस एकदा आर्थिकदृष्ठ्या सक्षम झाला की, तो मग दुसर्‍या पक्षातील नेत्यांचे सोडा, आपल्या पक्षातील नेत्यालाही जुमानत नाही, त्यामुळे मग पक्षातील शिस्त मोडून पडते, पक्षामध्ये अनागोंदी माजते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशीच अनागोंदी माजल्याचे दिसत आहे. त्याला आता कसा आवर घातला जाणार हे एक मोठे कोडे आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर असे दिसून येईल की, राज्यातील राजकारण अनेक पक्षांमध्ये आणि गटातटात विभागले गेले आहे. कुठला नेता नेमका कुठल्या पक्षात आहे, कुणाच्या गटात आहे, हे सामान्य नागरिकाला कळेनासे झाले आहे. कारण ज्याला आपण आज विशिष्ट पक्षाचा नेता मानत होतो आणि त्याचे अनुयायी होतो, पण तो नेता दुसर्‍या दिवशी कुठल्या पक्षात गेला असेल याचा काहीच भरवसा नाही. यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे सत्ता आणि संपत्ती. निष्ठा कधीच खुंटीला बांधल्या गेल्या आहेत. आता तुमच्या तत्वांपेक्षा तुमची आर्थिक सक्षमता किती आहे, याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे, सगळेच पैशांच्या मागे धावत आहेत.

पैशाने काहीही खरेदी करता येते ही भावना राजकीय नेत्यांमध्ये फोफावत आहे. त्यामुळेच मग आपल्या आर्थिक सोयीप्रमाणे पक्ष बदलणे आणि आपणच कसे जनहितासाठी योग्य आहोत, दुसर्‍यांनी जनतेची कशी फसवणूक केली आहे. त्यांना जनता धडा शिकवेल, असे अगदी ठामपणे सांगितले जाते. कुणाकुणाला धडा शिकवायचा यावरून आता जनताही संभ्रमित झालेली आहे. त्यामुळे राजकीय पटलावर सध्या सगळाच सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. यातून जनतेची सुटका कशी होणार, याचीच चिंता जनेतला लागून राहिलेली आहे, पण जनता काय करणार असा प्रश्न आहे. राजकारण इतक्या पक्षांमध्ये विखंडित झालेले आहे की, कुणाला मत द्यावे हे लोकांनाच कळेनासे झालेले आहे, त्यामुळे ते नोटाला आपले मत देऊन आपली नाराजी आणि निषेध नोंदवतात, पण त्याविषयी राजकीय नेते फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही.

सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहता आपण एखाद्या मागास राज्यात आहोत का, असा भास होतो. कुणीही कुणावर अगदी कागदोपत्री पुरावे देऊन प्रसारमाध्यमांसमोर आरोप केले आणि एकमेकांना उघडे पाडले तरी कुणीही धुतल्या तांदळासारखे नाहीत, हे लोकांना माहीत आहे. म्हणूनच राजकीय नेत्यांना हाताच्या पाच बोटांची उपमा दिली जाते. म्हणजे ही बोटे उंचीने असमान असली तरी जेव्हा खायची वेळ येते तेव्हा ती एकत्र येतात. जेव्हा एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला होतो, तेव्हा सगळे नेते पक्षभेद विसरून एकत्र येतात आणि त्या घटनेचा निषेध करतात, कारण त्यांना माहीत असते, असे एकदा सुरू झाले तर आपलेही काही खरे नाही.

जेव्हा संसद किंवा विधिमंडळात खासदार, आमदारांचे वेतन, भत्ते, सुविधा, निवृत्ती वेतन वाढवून घ्यायचे असते, तेव्हा एकमुखाने ही मंडळी मंजुरी देतात, पण जेव्हा जनतेचे प्रश्न असतात, तेव्हा मात्र त्या प्रश्नांच्या ढाली आणि तलवारी करून एकमेकांविरोधात वापरल्या जातात. त्यामागे त्या प्रश्नाचे लोणी आपल्या पोळीवर कसे पडेल आणि त्याचा आपल्याला राजकीय फायदा कसा होईल हा हेतू असतो. होळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या होळीमध्ये आपल्या मनातील वाईट गोष्टींचे दहन करून टाकायचे असते आणि चांगल्या गोष्टींची नव्याने सुरुवात करायची असते, असे अपेक्षित असते. राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज पेटणार्‍या होळीमध्ये राजकीय अनागोंदीचे दहन करून नव्याने चांगली सुरुवात करावी हीच जनतेची अपेक्षा आहे.

First Published on: March 6, 2023 4:30 AM
Exit mobile version