पुरोगामी महाराष्ट्रात विटाळ!

पुरोगामी महाराष्ट्रात विटाळ!

संपादकीय

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीस मासिक पाळी आली म्हणून तिला वृक्षारोपण करण्यास रोखणार्‍या त्र्यंबकेश्वर येथील शिक्षकाची आता चौकशी सुरू झाली आहे. पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात आजही नैसर्गिक घटनांकडे पाप आणि पुण्य या दृष्टिकोनातून पाहिले जाणे ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. या घटनेकडे दोन्ही अंगाने बघणे गरजेचे आहे. मुळात मासिक पाळीविषयीचे आजही समाजात असणारे गैरसमज आणि दुसरी बाब म्हणजे प्रस्तुत घटनेची वस्तुस्थितीदर्शक चौकशी. या दोन्ही बाबी विभिन्न असल्या तरी सामाजिक जागृतीच्या दृष्टीने त्यावर विचार होणे गरजेचेच आहे. (Ashram school girl was prevented from planting trees because she was menstruating)

खरे तर, दर महिन्याला स्त्रीला येणारी मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक अशी घटना. या अफाट निसर्गचक्राचाच तो एक भाग. परंतु मासिक पाळीला महाराष्ट्रात विटाळ म्हणून संबोधले जावे यावरूनच काय ते लक्षात यावे. या चार दिवसांत मुलीला किंवा स्त्रीला घरात कुठल्याही वस्तूला हात लावण्यास मज्जाव केला जातो. कुठल्याही शुभकार्यात, देवदर्शनास जाऊ दिले जाते. स्वयंपाकघरात प्रवेश नसतो. मासिक पाळी म्हणजे जणू काही अदभुत, विलक्षण अशी काहीतरी वाईट घटना घडली आहे, अशी धारणा अनेक ठिकाणी दिसून येते.

वास्तविक, मासिक पाळी हा मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंधित भाग आहे. हे निसर्गचक्र नसते तर मानवी जीव सातत्य खुंटले असते. पण आजही आपल्या समाजामध्ये मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. या प्रश्नाकडे इतक्या खासगी पद्धतीने पाहिले जाते की त्याच्याभोवती लज्जेचे एक वलय निर्माण झाले आहे. एखादी गोष्ट जेव्हा लपवली जाते किंवा त्या बाबतीत मोकळेपणाने बोलले जात नाही, अशावेळी अपुर्‍या माहितीमुळे त्याविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात. म्हणूनच मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.

वयात आल्यानंतर ते रजोनिवृत्ती होईपर्यंत प्रत्येक निरोगी स्त्रीला दर महिन्यात मासिक पाळी येते. तशी ती येणे हा अत्यंत स्वाभाविक शरीरधर्म असतो. पण या चार दिवसांत अनेकजणींना निरनिराळ्या प्रकारचे त्रास होतात. कुणाला शारीरिक त्रास तर कुणाला मानसिक. पण मुळात या विषयावरच बोलण्यावर एक अलिखित सामाजिक बंदी असल्याने त्यादिवसांत होणार्‍या त्रासाबद्दल तर बोललेच जात नाही. मध्यंतरी रुपी कौरने मासिक पाळीबद्दलचा टॅबू मोडीत काढण्यासाठी मासिक पाळीदरम्यान कपड्यांवर लागणारे रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसणारा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. पण त्यातील संदेश लक्षात घेणे सोडून अनेकांनी रुपीला लक्ष्य केले.

मासिक पाळीबद्दल लाज बाळगण्याचं काही कारण नाही, हे सांगण्याचा तिचा उद्देश होता. त्याची बरीच चर्चाही झाली होती. गेल्या दोन दशकांत यासंदर्भात चर्चा झडायला सुरुवात झाली आहे. या काळात महिलांसोबत कुटुंबियांच्या आणि समाजाच्या व्यवहार-वागण्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. त्यातून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न असणार्‍या या मुद्या भोवतालचं मळभ काहीसे दूर व्हायला सुरुवात झाली आणि या सकारात्मक आणि भगीरथ प्रयत्नांचे दृष्य परिणाम अलिकडे आता दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच अलिकडच्या काळात ‘कुछ दाग अच्छे होते है’ सारख्या ‘टॅगलाईन’मुळे मासिकपाळीबद्दल समाज आता सामाजिक बदलांकडे जात असल्याचं सुखावह चित्र निर्माण झाले आहे. मात्र सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात येणारे ‘निळं’ रक्त पुन्हा आपल्याला वास्तवापासून दूरच नेऊ पाहत आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.

बर्‍याच संस्कृतींमध्ये आजसुद्धा महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित अनेक गैरसमज आहेत. घानामध्ये मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना नदी ओलांडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ऑफिन नदीवरच्या एका पुलाशी काही धार्मिक बाबी निगडित असल्यानं असं करण्यात आल्याचं सांगण्यात येते. मादागास्करमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात अंघोळ करण्यास मनाई केली जाते. तसेच नेपाळमधील अनेक भागांत आजही महिलांना मासिक पाळीच्या काळात वेगळ्या झोपड्यांमध्ये राहण्याची जबरदस्ती केली जाते. अंधश्रद्धेला सीमा नसतात हे यावरुन स्पष्ट होते. मासिक पाळी संदर्भात अशा अनेक अनिष्ट प्रथा आपल्या समाजामध्ये रुढ आहेत. या प्रथांचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मासिक पाळीकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार केला पाहिजे. जर प्रत्येकाने स्वतःपासून याची सुरुवात केली तर, आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या स्त्रिया मासिक पाळीच्या काळात जो शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करतात तो थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या घटनेमुळे हा मुद्दा चर्चिला गेला त्या घटनेच्या वस्तुस्थितीचा अभ्यास करणे. पाळी आहे म्हणून वृक्षारोपणास नकार दिला म्हणून हा विषय चर्चिला गेला. असे कृत्य खरोखरच झाले असेल तर त्याचे समर्थन होऊच शकत नाही, पण ज्या पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यात आली आहे त्याचीही शहानिशा होणे गरजेचे आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. असे आदेश कोणतीही चौकशी न करता देणे योग्य आहे का, याचाही विचार होणे क्रमप्राप्त आहे. आपल्याकडे स्त्रीयांच्या समस्यांकडे सजगतेने बघितले जाते ही स्वागतार्ह बाब आहेच.

पण याच सजगतेचा काही पातळ्यांवर गैरफायदाही उचलला जाताना दिसतो. प्रस्तुत प्रकरणात शाळेने केलेल्या दाव्यानुसार, शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू झाल्यापासून संबंधित विद्यार्थीनी ३८ दिवसांपैकी फक्त ७ दिवस हजेरी पत्रकावरुन उपस्थित असल्याचे दिसते. ज्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात वाद निर्माण झाला त्या काळात ही विद्यार्थीनी शाळेत उपस्थितच नव्हती. त्यामुळे या प्रकरणाविषयी संशय निर्माण होतो.

मुळात विद्यार्थीनीला मासिक पाळी आली असल्याची बाब शिक्षकांना कशी कळली? या विषयावर खुलेपणाने चर्चा करण्याची परंपरा आदिवासी भागात आहे का? लेखी तक्रार करण्यापर्यंतचे धारिष्ठ्य विद्यार्थीनीत कसे आले? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रकरणात तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित शिक्षकास भर चौकात फटके द्यावे, परंतु चौकशीच्या अहवालातील निष्कर्ष अद्याप पुढे आलेले नसताना शिक्षकाला सरळसोटपणे दोषी धरणे योग्य नाही.

अन्यथा अन्य भागातही ‘ब्लॅकमेलिंग’चे प्रकार सुरू होतील. त्यातून शिक्षकांना काम करणे मुश्किल होईल. अशा आरोपांनी शिक्षकांचे संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते. महिलांच्या सुरक्षिततेचा विचार होत असतानाच जर सुरक्षिततेच्या नावाने शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर त्याचाही विचार व्हावा, इतकेच.

First Published on: July 29, 2022 3:00 AM
Exit mobile version