शिव…शिव…

शिव…शिव…

संपादकीय

महाराष्ट्रासह देशभर महाशिवरात्रीच्या जल्लोषाला सुरुवात झाली असताना आदल्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी सनसनाटी वृत्त येऊन धडकले आणि सर्व वृत्तवाहिन्यांनी तेच वृत्त वारंवार चालवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेनेवर केलेला दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केला हे ते वृत्त होते. स्वाभाविकच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली, तर उद्धव ठाकरे यांच्या गोटात कमालीचा सन्नाटा पसरला, मात्र थोड्याच वेळात ठाकरे प्रसारमाध्यमांना सामोरे गेले आणि उद्भवलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे सूतोवाच त्यांनी केले. अर्थात हडबडलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना तात्काळ धीर देण्याची गरज होती, ती नेता म्हणून त्यांनी पार पाडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने घेतला आणि तेथेच भविष्यातील फुटीची बिजे रोवली गेली, मात्र प्रकरण इतक्या टोकाला जाऊन ते मुळावर उठेल असे कुणाला वाटले नसेल, मात्र भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या चाणाक्ष नजरेने महाराष्ट्रातील शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस हेरली आणि पुढचे रामायण घडले.

गेल्या वर्षी २२ जून रोजी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या शिंदे आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांनी थेट सुरत गाठले. तेथून ज्या घटना घडल्या त्या एखाद्या चित्रपटाच्या पटकथाकारालाही सुचल्या नसतील इतक्या वेगाने घडल्या. शिंदे गटाचा सुरत, गुवाहाटी असा प्रवास झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची २३ जून रोजी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्याच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली होती, मात्र ३० जून रोजी ऐनवेळी भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार निश्चित झालेले असताना अचानक दिल्लीहून सूत्रे हलली आणि अनपेक्षितरित्या उपमुख्यमंत्री होणारे शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढे शिंदे गटात मूळ शिवसेनेतील आमदार, खासदारांचा ओघ सुरू झाला. शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सांगत ठाकरे यांना धक्का देण्यास सुरुवात केली.

त्यापूर्वी बहुमत चाचणीच्या मुद्यावरून प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद सुरू होता. दरम्यानच्या काळात शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने या गटाने चिन्ह आणि पक्षावर निवडणूक आयोगाकडे दावा केला. तेथे दोन्ही बाजूकडून ढीगभर कागदपत्रांसह तोंडी युक्तिवाद झाला. यावरील सुनावणी जानेवारी अखेरीस पूर्ण झाल्यानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले, मात्र १६ आमदारांच्या अपात्रतेच्या न्यायालयापर्यंत पोहचलेल्या मुद्याचा निकाल येईपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत निकाल देऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली, परंतु ही विनंती फेटाळण्यात येऊन शिंदे गटाचा धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षावरील दावा अबाधित ठेवला. पक्षाची घटना, पदाधिकार्‍यांच्या निवडी आदी तांत्रिक मुद्यावरून शिंदे गटाचा दावा आयोगाने मान्य केला. यावर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

न्यायालयाने आयोगाचा निर्णयच कायम ठेवला तर ठाकरे यांची मोठी पंचाईत होणार आहे. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेला हा प्रचंड मोठा धक्का आहे. नेते पक्षातून बाहेर पडण्याचा अनुभव शिवसेनेला नवीन नव्हता, पण फुटलेल्या एका नेत्यासह त्याच्या गटाने शिवसेनाच आपल्या ताब्यात घेतली हा अभूतपूर्व प्रकार असून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासात या घटनेची नोंद कायमस्वरूपी राहणार आहे. नेहरू-गांधी घराण्याशिवाय काँग्रेस असूच शकत नाही अशी त्या पक्षातील कार्यकर्त्यांची जशी मानसिकता आहे, तशीच मानसिकता उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांची आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घराणे वेगळे असूच शकत नाही असे वाटणारे ते शिवसैनिक आहेत. त्यामुळे या शिवसैनिकांना धीर देताना उद्धव ठाकरे यांची दमछाक होणार आहे.

शून्यातून पुन्हा त्यांना नव्या पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. नव्या पक्षाला ते कोणते नाव देणार हा औत्सुक्याचा भाग बनून राहील. महाविकास आघाडीत तत्कालीन शिवसेना सामील झाल्याने इतके मोठे रामायण-महाभारत घडले. भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आपल्यासमोर असणार नाही याची जशी काळजी घेत ‘ऑपरेशन फोडाफोड’ यशस्वी केले तसे उद्धव ठाकरे यांना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडता येणे लगेचच शक्य नाही. शिवसेना हा ब्रँड आपल्यासोबत राहिला नसल्याने दोन्ही काँग्रेसची सहानुभूती यापुढे उद्धव ठाकरे यांना मिळेल का, हाही कळीचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो किंबहुना यावर चर्चा उपस्थित होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे ठाकरे यांना कट्टर शिवसैनिकांची मिळणारी सहानुभूती हे दोन्ही पक्ष नजरेआड करणार नाहीत. व्हिपच्या तांत्रिक बाबीपासून आणखी वेगवेगळ्या कारणांनी ठाकरे यांची दमछाक करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अर्थातच या पक्षाचे गॉडफादर असलेल्या भाजपकडून होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

सध्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीपर्यंत जाऊन पोहचल्याची प्रतिक्रिया जनमानसात अलीकडे वारंवार उमटू लागली आहे. येत्या काही दिवसांत महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. लोकसभाही तोंडावर आहे. अशा वेळी आपल्याला मिळणारी सहानुभूती कायम टिकविण्यात उद्धव ठाकरे कितपत यशस्वी होतात हेही पाहावे लागेल. कुंपणावर बसलेले ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्याकडे जातील. तेथे ते सवयीप्रमाणे शिवसेना झिंदाबादचे नारे सुरू करतील. त्यामुळे आगामी काळ उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांची कसोटी पाहणारा आहे. त्यांना या कसोटीला उतरावेच लागेल अन्यथा शिव…शिव… करीत बसण्याची वेळ त्यांच्यावर येईल आणि ती अवस्था कट्टर शिवसैनिक किंवा ठाकरेप्रेमींसाठी क्लेषकारक असेल.

First Published on: February 20, 2023 4:00 AM
Exit mobile version