गरीबांच्या आरोग्यासाठी झटणारे डॉ. अभय बंग

गरीबांच्या आरोग्यासाठी झटणारे डॉ. अभय बंग

डॉ. अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक आरोग्यासाठी ते चार दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन, अ‍ॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेची स्थापना केली. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे बालपण वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात गांधीजींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत गेले. लहानपणापासूनच अभय आणि अशोक बंग या भावंडांमध्ये आपण आयुष्यात काय करावे या विषयी चर्चा चाले. अशोकने शेतकी क्षेत्रात काम करायचे ठरवले तर अभयने खेड्यातील रहिवाशांचे आरोग्य या क्षेत्रात काम करायचे ठरवले.

त्यांनी नागपूर विद्यापीठातून एम.बी.बी.एस. आणि एम.डी. (वैद्यकशास्त्र) या पदव्या संपादन केल्या. त्यांच्या सहचारिणी राणी बंग यांनीही एम. डी. (स्त्रीरोगतज्ज्ञ) ही पदवी मिळवली. दोघांनीही आपापल्या विषयांत सुवर्णपदक मिळवले. अभय आणि राणी बंग या दोघांनाही सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करण्यामध्ये आवड होती. या दिशेने परिणामकारकरीत्या काम करण्यासाठी या विषयामध्ये अभ्यास करण्याची गरज लक्षात घेऊन १९८४ मध्ये दोघांनीही बाल्टिमोर येथील हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून ‘सामाजिक आरोग्य’ या विषयात पदव्युत्तर अभ्यास केला.

अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे कामाला सुरुवात केली. त्यांनी ‘सर्च’ या संस्थेची स्थापना डिसेंबर १९८५ मध्ये केली. आदिवासी आणि खेडोपाड्यातील आरोग्यविषयक अडचणींवर तोडगा काढायच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी या कामामध्ये तेथील रहिवाशांना साथीदार बनवले. त्यांच्या गरजेनुसार क्लिनिक्स आणि दवाखान्याची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये ‘निर्माण’ नावाची संस्था स्थापित केली. तरुण, होतकरू, समाजासाठी वेगळे काही करू इच्छिणार्‍या युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम ही संस्था करते. त्यांनी ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’, ‘आशा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठीचे पुस्तक’, ‘सेवाग्राम ते शोधग्राम’, ‘कोवळी पानगळ’ इत्यादी पुस्तके लिहिली आहेत.

First Published on: September 23, 2022 4:00 AM
Exit mobile version