अमर हुतात्म्यांचा स्मरणदिन ऑगस्ट क्रांती दिन

अमर हुतात्म्यांचा स्मरणदिन ऑगस्ट क्रांती दिन

क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतिदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ असे म्हणतात. ९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली होती. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. गांधीजींनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. आता कार्यकर्ता नाही तर नेता बना, असे आवाहनदेखील गांधीजींनी देशातील नागरिकांना केले. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा करो या मरोचा लढा मानला जातो. इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देऊन चालते व्हावे, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला.

९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालीया टँक येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाअधिवेशन भरले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची सुरुवात ‘गवालीया टँक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली आणि नंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला.

धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनआंदोलनात सामील झाले. इंग्रजांना परिस्थिती हाताळताना नाकीनऊ आले. भांबावलेल्या ब्रिटिश सरकारने आंदोलकांवर गोळीबार सुरू करण्याचा आदेश दिला, मात्र लोकांनी ब्रिटिशांच्या गोळीबाराला, लाठी हल्ल्याला न घाबरता आंदोलन सुरूच ठेवले. ब्रिटिशांनी या प्रकरणी महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक केली. ब्रिटिशांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे प्रचंड उद्रेक झाला. स्वातंत्र्याची पहाट या जनआंदोलनामुळे उगवली.

First Published on: August 9, 2022 4:00 AM
Exit mobile version