ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ मध्ये त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी बीए एमए आणि पीएचडीच्या पदव्या मिळवल्या. त्या काळात त्यांनी रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळवली. त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली.

सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ ला जेव्हा हॉईल यांनी केंब्रीज येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरॉटिकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्वाचा वाटा होता. १९६६ ते १९७२ पर्यंत ते या संस्थेशी निगडित होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्रात एकत्र संशोधन केले. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोलशास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याचबरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले.

 

First Published on: July 19, 2022 4:00 AM
Exit mobile version