चित्रपट, नाट्य संगीतकार आनंद मोडक

चित्रपट, नाट्य संगीतकार आनंद मोडक

आनंद मोडक यांचा आज स्मृतिदिन. आनंद मोडक हे मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचे संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अकोल्यात झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि मग पुणेकरच होऊन गेले. पुण्यात आल्यावर कॉलेजमध्ये जाता-जाता तेव्हाच्या पुण्यातल्या समृद्ध कलाविश्वाचा ते सहजच एक हिस्सा बनून गेले. त्यांच्या कलाजीवनाची सुरुवात ७२ च्या सुमारास झाली असली तरी त्यांनी संगीत दिलेले पहिले नाटक ठरले ते १९७४ मधले ‘महानिर्वाण’.

त्यापाठोपाठ ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘पडघम’, ‘विठ्ठला’, ‘तुमचे आमचे गाणे’, ‘अफलातून’, ‘संगीत म्युनिसिपाल्टी’, ‘अलिबाबाची हीच गुहा’, ‘जळ्ळी तुझी प्रीत’, ‘लीलावती’, ‘प्रीतगौरीगिरीशम’, ‘मेघदूत’, ‘मदनभूल’, ‘संगीत प्रारंभायन’, असा एक वेगळा प्रवास सुरू झाला. यातील वैविध्य लक्षणीय होते. पौराणिक, ऐतिहासिक, संस्कृत साहित्यातील कलाकृती, अनुवादित नाटके, कॉमेडी, असे अनेक प्रकार त्यांनी सांगीतिकदृष्ठ्या अर्थपूर्ण केले. या सार्‍याला नंतर पार्श्वसंगीताचाही सूर येऊन मिळाला.

नाटक, चित्रपट, मालिकांच्या विश्वात गुंतले असतानाही त्यांनी आपली आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांशी प्रारंभापासून जुळलेली नाळ तुटू दिली नाही. १९७६ मध्ये त्यांनी आकाशवाणीसाठी ‘बदकाचं गुपित’ ही संगीतिका केली. ती इतकी गाजली, की त्याचे स्वतंत्र ७५ प्रयोग राज्यभरात झाले. ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘लपंडाव’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘तू तिथे मी’, ‘राजू’, ‘उरूस’, ‘फकिरा’, ‘बाईमाणूस’ अशा २० वर्षांच्या अवधीत त्यांनी तब्बल ५३ मराठी व हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला. चित्रपटांसाठी संगीत देतानाही त्यांनी कायम दर्जा जपला. अशा या श्रेष्ठ संगीतकाराचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.

First Published on: May 23, 2023 3:00 AM
Exit mobile version