न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरुष होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिकमधील निफाड येथे झाला. त्यांचे मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. त्यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले. त्यांनी १८६२ मध्ये बी. ए., १८६४ मध्ये एम. ए., १८६५ मध्ये ते कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

१८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली. मराठी भाषेत जे ग्रंथ त्यावेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी अ‍ॅडव्होकेटची परीक्षा दिली. न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ मध्ये रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली.

१८६२ मध्ये त्यांनी ‘इंदुप्रकाश’ या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाजसुधारणेची मीमांसा अनेक लेख लिहून केली. समाजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस व सामाजिक परिषद या दोन संस्था निर्मिल्या. समाजसुधारणेच्या विचारांचा आधार म्हणून निश्चित असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्मसुधारणा व समाजसुधारणा ही भिन्नभिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध आहेत, म्हणून समाजजीवनाचा साकल्याने विचार केला पाहिजे असा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता. अशा या थोर समाजसुधारकाचे १६ जानेवारी १९०१ रोजी निधन झाले.

First Published on: January 18, 2023 1:00 AM
Exit mobile version