गीतकार, कवी आनंद बक्षी

गीतकार, कवी आनंद बक्षी

आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मिरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई सुमित्रा आनंद बक्षी ते पाच वर्षांचे असताना वारली. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणीदरम्यान २ ऑक्टोबर, १९४७ रोजी भारतात आले. डकोटा विमानातून दिल्लीला आल्यावर बक्षी कुटुंब पुणे, मेरठ आणि शेवटी परत दिल्लीत येऊन स्थायिक झाले. कविता हा त्यांचा जीव की प्राण. त्यांचे विश्वच निराळे. शब्दांच्या मळ्यात फिरणारे. त्यात त्यांच्या वाट्याला आली लष्करातली नोकरी.

लष्कराच्या कडक शिस्तीत शब्दांना अधिकच साचेबद्धता आली. ते रुक्ष वातावरण, तो युद्धाचा सराव, लष्करी कवायत अशा वातावरणात हा शब्दप्रभू कवितेच्या मळ्यात खुशाल बागडायचा. अंगच्या प्रतिभेने रुपेरी पडद्याच्या दालनात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी रसिकांना जिंकले. कारण त्यांच्या शब्दांची जादूच तशी होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांनी तरुणाईला झिंग आणली. गायक व्हायचे आनंद बक्षींच्या मनात खूप होते. मात्र, त्यांच्यातील कविमनाने गायकीवर मात केली. ते गीतकार बनले आणि जन्माला आली तुमचे-आमचे जीवन फुलवणारी, अविस्मरणीय गाणी.

शब्दांच्या या जादुगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता असो, आनंद बक्षींच्या लेखणीने या सर्व भावना रसिकांच्या मनी ठसायच्या. १९५८ मध्ये आलेल्या ‘भला आदमी’ या चित्रपटात आनंद बक्षींनी पहिल्यांदा गीते लिहिली. ‘धरती के लाल न कर इतना मलाल’ हे त्यांचे पहिले गाणे. आनंद बक्षी प्रकाशझोतात आले ते ‘जब जब फूल खिले’च्या गीतांमुळे. या चित्रपटात त्यांची लेखणी अशी खुलली की तिने रसिकांची मने काबीज केली. ‘ये समा, समा है ये प्यार का’ हे यातले लताच्या आवाजातले गाणे आजही ताजे, टवटवीत वाटते. अशा या महान गीतकाराचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले.

First Published on: July 21, 2022 12:01 AM
Exit mobile version