प्रभावी वक्ते, साहित्यिक राम शेवाळकर

प्रभावी वक्ते, साहित्यिक राम शेवाळकर

राम बाळकृष्ण शेवाळकर हे साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते होते. त्यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला. त्यांचे वडील विदर्भात ‘कीर्तनकेसरी’ म्हणून प्रसिद्घ होते. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून, लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथेच झाले. नंतर अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून ते बी.ए. (१९५२) आणि नागपूर विद्यापीठातून एम.ए. (संस्कृत १९५४, मराठी १९५६) झाले.

वाशीम येथील शासकीय प्रशालेत ते सुरुवातीला शिक्षक होते (१९५४-५५). त्यानंतर निरनिराळ्या महाविद्यालयांतून प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. ‘असोशी’ (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘रेघा’(१९६७) आणि ‘अंगारा’ (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ठ्य होय.

लोकनायक बापूजी अणे यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांनी लोकनायकांचे वाङ्मय स्वखर्चाने प्रकाशित केले. ‘पाणियावरी मकरी’ (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र. शेवाळकरांनी अनेक वाङ्मयीन-सांस्कृतिक-शैक्षणिक संस्थांतून विविध पदांवर कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे ते सतत नऊ वर्षे अध्यक्ष होते. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार (१९९७), साहित्य धुरंधर पुरस्कार, बॉस्टन, अमेरिका (१९९७), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९) आदींचा समावेश आहे. अशा या थोर साहित्यिकाचे ३ मे २००९ रोजी निधन झाले.

First Published on: March 2, 2023 4:15 AM
Exit mobile version