शिक्षणतज्ज्ञ लोकनायक डॉ. माधव अणे

शिक्षणतज्ज्ञ लोकनायक डॉ. माधव अणे

लोकनायक डॉ. माधव श्रीहरी अणे उर्फ बापूजी अणे हे एक शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि आधुनिक संस्कृत कवी होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाला. बालपणापासून प्राचीन भारतीय संस्कृतीचे सर्व संस्कार त्यांच्यावर झाले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चालू असताना त्यांना त्यांच्या कुटुंबातून प्राचीन वळणाचे शिक्षण दिले गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये झाले. मॉरिस कॉलेजमध्ये असताना त्यांंचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला. कॉलेजमध्ये झालेल्या लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाचा प्रभाव त्यांच्यावर झाला. लोकमान्य टिळकांची राजकारणाची परंपरा तर बापूजींनी चालवलीच पण त्यांची वेद, पुराण व वाङ्मयाच्या अध्ययन-संशोधनाचीही परंपरा त्यांनी पुढे चालविली. त्यांनी सरकारी नोकरी न करता अध्यापनाचा व्यवसाय करावयाचे ठरविले.

अमरावतीच्या ‘काशीबाई हायस्कूलमध्ये’ त्यांनी शिक्षक म्हणून प्रवेश केला. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास साधला जावा तसेच शिक्षण हे देवसेवा व देशसेवा यांची जाण निर्माण करण्यास पोषक असावे, असे त्यांचे मत होते. तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी या उदात्त हेतूने त्यांनी यवतमाळ येथे १९२८ मध्ये ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’ ची स्थापना केली, हेच हायस्कूल आज ‘लोकनायक बापूजी अणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ म्हणून ओळखले जाते. तसेच यवतमाळ येथील दत्तचौक येथे असलेले स्व:तचे राहते घर शैक्षणिक कार्यासाठी बापूजी अणे यांनी उपलब्ध करून दिले. या ठिकाणी आज लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय सुरू आहे. त्यांनी मराठी व संस्कृत साहित्य क्षेत्रातही मौलिक कार्य केले आहे. ‘गणपती देवता’, प्राचीन संस्कृती विषयक लेख, लोकमान्य टिळक यांच्यावर संस्कृतमध्ये लिहिलेला ‘श्रीतिलकयशोर्णव’ हा ८५ तरंगातील सुमारे १२ हजार श्लोकांचा विशाल ग्रंथ एक महाकाव्याच होय. अशा या प्रतिभावान लोकनायकाचे २६ जानेवारी १९६८ रोजी निधन झाले.

First Published on: August 29, 2022 5:30 AM
Exit mobile version