कादंबरीकार, समीक्षक वा. म. जोशी

कादंबरीकार, समीक्षक वा. म. जोशी

वामन मल्हार जोशी हे मराठी कादंबरीकार, साहित्य समीक्षक, तत्त्वचिंतक होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी कुलाब्यातील तळे या गावी झाला. १९०६ मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. केले. त्यानंतर कोल्हापूर येथील समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. विजापूरकरांच्या बरोबर विश्ववृत या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली.

याच मासिकात १९०८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘वैदिक धर्माची तेजस्विता’ या लेखाबद्दल राजद्रोहाचा आरोप येऊन त्यांना ३ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर ५ वर्षे केसरी-मराठा संस्थेत त्यांनी काम केले. पुढे महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील पाठशाळेत प्राध्यापक म्हणून ते दाखल झाले (१९१८) व सेवानिवृत्तीपर्यंत त्याच संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम करीत राहिले.

रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद (दुसरी आवृ. १९१५) या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांनंतर ‘आश्रमहरिणी’ (१९१६), ‘नलिनी’ (१९२०), ‘सुशिलेचा देव’ (१९३०), ‘इंदु काळे व सरला भोळे’ (१९३४) या ४ कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. कर्तव्य आणि ध्येयनिष्ठा; कलाप्रेम आणि नीतीबंधने; बुद्धी आणि श्रद्धा; व्यक्तिस्वातंत्र आणि सामाजिक-नैतिक बंधने यांसारखे जीवनविषयक मौलिक प्रश्न त्यांनी आपल्या कादंबर्‍यांतून उपस्थित केले. कादंबर्‍याप्रमाणेच त्यांच्या अन्य लेखनालाही एक लक्षणीय वैचारिक बैठक आहे. त्यांचे साहित्यसमीक्षात्मक लेखन थोडेच असले, तरी त्यातून साहित्यविषयक मूलभूत प्रश्न उपस्थित करून त्यांची सोडवणूक कोणत्या दृष्टीने करावी, याचे अचूक मार्गदर्शन त्यांनी केले आहे. अशा या प्रतिथयश साहित्यिकाचे २०जुलै १९४३ रोजी निधन झाले.

First Published on: January 21, 2023 4:56 AM
Exit mobile version