विचारवंत, समीक्षक निर्मलकुमार फडकुले

विचारवंत, समीक्षक निर्मलकुमार फडकुले

निर्मलकुमार जिनदास फडकुले हे विचारवंत, शैलीदार वक्ते, ललितलेखक आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापुरातील जैन पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी मॉडेल इंग्लिश स्कूल व हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे घेतले. त्यांच्यावर शालेय वयातच संस्कृतच्या अध्ययनाचे, साहित्याचे आणि वक्तृत्व गुणांचे संस्कार झाले. त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यातील वक्ता आणि साहित्याचा अभ्यासक घडला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले आणि सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी एम. ए. चे शिक्षण घेतले. १९७० मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी संपादन केली.

त्यांनी १९५६ पासून सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा आणि साहित्याचे अध्यापनकार्य केले. विभागप्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली. प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना आणि निवृत्तीनंतरही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गोमंतक, बंगळूरू, धारवाड, कारवार, इंदूर, जयपूर, मीरत, बडोदे, दिल्ली, कोलकाता येथील उल्लेखनीय अशा व्यासपीठांवरून आपले विचार मांडले. केवळ मराठीतूनच नव्हे तर हिंदी भाषेतूनही त्यांनी अनेक व्याख्याने दिली. त्यांची २८ स्वतंत्र पुस्तके, तर ११ संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उपहासगर्भ, मिस्कील तरीही मन आणि बुद्धीला आवाहन करणारे ललितलेखन त्यांनी प्राचुर्याने केले.

त्यात ‘हिरव्या वाटा’(१९८६), ‘काही रंग काही रेषा’ (१९८६), ‘आनंदाची डहाळी’ (१९८८), ‘रंग एकेकाचे’ (१९९३), ‘जगायचं कशासाठी?’, ‘अमृतकण कोवळे’ (१९९५), ‘प्रिय आणि अप्रिय’ (१९९८), ‘चिंतनाच्या वाटा’ (२०००), ‘मन पाखरू पाखरू’ (२००१), ‘दीपमाळ’(२००५), ‘अजून जग जिवंत आहे!’(२००५), ‘काटे आणि फुले’ (२००७) यांचा समावेश आहे. ‘चिंतनशील प्रकृतीचा लेखक वाचकनिष्ठ असण्यापेक्षा विचारनिष्ठ असतो’ हे त्यांच्या लेखनातून निरंतर जाणवत राहते. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, प्रज्ञावंत पुरस्कार, यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार, असे अनेक सन्मान त्यांना लाभले. अशा या श्रेष्ठ विचारवंताचे २८ जुलै २००६ रोजी निधन झाले.

First Published on: November 16, 2022 3:51 AM
Exit mobile version