प्राच्यविद्या संशोधक डॉ. वासुदेव मिराशी

प्राच्यविद्या संशोधक डॉ. वासुदेव मिराशी

डॉ. वासुदेव विष्णू मिराशी हे भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक होते. त्यांचा जन्म १३ मार्च १८९३ रोजी रत्नागिरीतील कुवळे येथे झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये तसेच पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. मॅट्रिक (१९१०), बी.ए. (१९१४) व एम ए. (१९१६) यात पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर शासकीय एल्फिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई) प्राध्यापक म्हणून काम केले (१९१७-१९१९). या काळात एलएल.बी. पदवी मिळविली आणि अद्वैतब्रह्यसिद्धि या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले.

पुढे नागपूरच्या मॉरिस कॉलेजात व अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजात प्राध्यापक व प्राचार्य (१९४७ ते १९५०) म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी काम केले. मिराशींचा मूळ पिंड शिक्षकाचा होता आणि त्यांचा अध्ययन-अध्यापनाचा विषय संस्कृत वाङ्मय असला; तरी हिरालाल आणि का. ना. दीक्षितांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते भारतीय इतिहासाच्या पुराभिलेख, नाणकशास्त्र इत्यादी शास्त्रांकडे वळले. एपिग्राफिया इंडिका(खंड २१-१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला.

त्यानंतरच त्यांनी कालिदास हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले (१९३४). सातवाहन, वाकाटक, कलचुरी-चेदी, शिलाहार इत्यादी प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. यासाठी त्यांनी विविध भौगोलिक प्रदेशांचा कसून शोध घेतला. १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले. अशा या महान संशोधकाचे ३ एप्रिल १९८५ रोजी निधन झाले.

First Published on: March 13, 2023 4:00 AM
Exit mobile version