समाजसेवक साहित्यिक श्री. म. माटे

समाजसेवक साहित्यिक श्री. म. माटे

श्रीपाद महादेव माटे हे बहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीदार साहित्यिक, नामवंत प्राध्यापक, अस्पृश्यताविरोधी कार्य करणारे कृतीशील, निष्ठावान समाजसेवक होते. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १८८६ रोजी विदर्भातील शिरपूर या गावी झाला. त्यांचे शिक्षण सातारा व पुणे येथे एम. ए. पर्यंत झाले. त्यांच्या विद्यार्थीजीवनात रँग्लर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, गो. चिं. भाटे, पां. दा. गुणे, सीतारामपंत देवधर यांसारख्या थोर अध्यापकांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले.

लोकमान्य टिळक, थोर संस्कृत पंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांच्या जीवनांचाही प्रभाव माटे यांच्यावर पडला. सातारा (न्यू इंग्लिश स्कूल) आणि पुणे (न्यू इंग्लिश स्कूल नूतन मराठी विद्यालय) येथील शाळांतून अध्ययन केल्यानंतर १९३५-४६ या मध्ये पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलदायी झाली.

माटे यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात त्यांनी ‘केसरीप्रबोध’ (१९३१) या ग्रंथाचे एक संपादक म्हणून परिश्रमपूर्वक काम केले. माटे यांनी या ग्रंथासाठी लेखनही केले. महाराष्ट्र सांवत्सरिक हा माटे यांनी संपादिलेला आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ हा आपला मूलगामी ग्रंथ लिहिण्यापूर्वी अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी अनेक वर्षे तळमळीने केले होते. ‘उपेक्षितांचे अंतरंग’ (१९४१), ‘अनामिका’ (१९४६), ‘माणुसकीचा गहिवर’ (१९४९), ‘भावनांचे पाझर’ (१९५४) यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘

पश्चिमेचा वारा’ (१९५६) ही त्यांची एकमेव कादंबरी. ‘साहित्यधारा’ (१९४३), ‘विचारशलाका’ (१९५०), ‘विचारमंथन’ (१९६२) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय होत. विविध नियतकालिकांतूनही त्यांनी विपुल लेखन केले. आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित व स्वतंत्र ठेवून मराठी वाङ्मयावर एक चिरंतन मुद्रा उमटविणार्‍या थोर ज्ञानोपासकांत माटे यांची गणना केली जाते. अशा या थोर साहित्यिकाचे २५ डिसेंबर १९५७ रोजी निधन झाले.

First Published on: September 2, 2022 4:51 AM
Exit mobile version