समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे

समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे

शकुंतलाबाई परांजपे या समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. केले. साहित्य, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी संचार केला. बुद्धिमान, स्वतंत्र विचारांची आणि बुद्धीला पटेल तेच करणारी स्त्री अशी त्यांची ओळख होती. ललित लेख, नाटक, कादंबरी असे वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले.

जेव्हा संपूर्ण देश ब्रिटिशांशी स्वातंत्र्याकरता झगडत होता, तेव्हा शकुंतलाबाई या स्वातंत्र्योत्तर काळात भारताला भेडसावू शकेल अशा प्रश्नाचे उत्तर शोधत होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात देशाची वाढती लोकसंख्या ही देशाच्या प्रगतीला मारक ठरू शकते, हे त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात उमगले होते. त्यावर उपाय शोधून काढून त्या उपायासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याच्या कामी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. ते कार्य होते कुटुंब नियोजनाचे महत्त्व आणि उपयुक्तता लोकांना पटवून देण्याचे.

ज्या काळी संततीनियमनाचे नाव घेणे हा देखील एक सामाजिक अपराध होता, तेव्हा एका स्त्रीने त्याकरता जागृती करणे म्हणजे मोठाच गुन्हा होता. पण तरीही न डगमगता, न अडखळता त्यांनी कुटुंबनियोजनाच्या संदर्भात पुण्यातून काम सुरू केले. मुंबईत र. धों. कर्वे यांच्याकडून शिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी पुणे येथे आपल्या राहत्या घरी कुटुंबनियोजनाचे केंद्र सुरू केले. असंख्य अडचणींवर मात करत त्यांनी हाती घेतलेले कार्य निर्धाराने पुढे चालवले. अशा या थोर समाजसेविकेचे ३ मे २००० रोजी निधन झाले.

First Published on: January 17, 2023 5:00 AM
Exit mobile version