सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी

सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी

चिंतामण विनायक जोशी हे सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. फर्ग्युसन कॉलेजातून बी. ए. (१९१३), एम. ए. (१९१६) झाले. त्यांचा पाली भाषेचा विशेष व्यासंग होता.

आरंभी चार वर्षे सरकारी शिक्षणखात्यात माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. पुढे १९२० पासून बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक म्हणून काम केले.

‘अ मॅन्युअल ऑफ पाली सद्धम्मप्पकासिनी’ (संपादक), ‘पाली कंकॉर्डन्स‘ (कोश), ‘जातकांतील निवडक गोष्टी’ (१९३०), ‘शाक्यमुनि गौतम’ (१९३५), ‘बुद्धसंप्रदाय व शिकवण’ (१९६३) ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे, पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्वाची होय. विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडकर्‍यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या ‘एरंडाचे गुर्‍हाळ’ (१९३२) मधील लेखन व ‘चिमणरावांचे चर्‍हाट’(१९३३) मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो.

त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वाभाविक संवादांनी नटलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्याऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. अशा या सुप्रसिद्ध लेखकाचे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.

First Published on: January 19, 2023 3:00 AM
Exit mobile version