जागतिक क्षयरोग दिन

जागतिक क्षयरोग दिन

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस जंतूमुळे होतो व तो अत्यंत संसर्गजन्य व घातक असा रोग आहे. १८८२ मध्ये डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग हा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी म्हणून ओळखले जाते. हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.

यात मुख्यतः ७५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांनाही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात, पण या सर्वांनाच क्षयरोग होत नाही. कारण, हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात, पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात.

ज्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूंचा संसर्ग होतो. भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात.

First Published on: March 24, 2023 4:00 AM
Exit mobile version