श्रेष्ठ लेखक, अनुवादक सदानंद रेगे

श्रेष्ठ लेखक, अनुवादक सदानंद रेगे

सदानंद रेगे हे श्रेष्ठ कवी, कथाकार आणि अनुवादक होते. त्यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्येही ते एक वर्ष होते. कौटुंबिक अडचणींमुळे १९४२ पासूनच त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. पश्चिम रेल्वेत त्यांनी दीर्घकाळ नोकरी केली. पुढे काही काळ ते मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते.

कवी आणि कथाकार या दोन्ही नात्यांनी रेग्यांनी मराठी साहित्यात वैशिष्ठ्यपूर्ण स्थान मिळविले. त्यांच्या अनुवादित ललितकृतींनीही मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. ‘अक्षरवेल’ (१९५७), ‘गंधर्व’ (१९६०), ‘देवापुढचा दिवा’ (१९६५), ‘वेड्या कविता’ (१९८०), ‘ब्रांकुशीचा पक्षी’ (१९८०) हे त्यांचे महत्वाचे कवितासंग्रह. ‘जीवनाची वस्त्रे’ (१९५१), ‘काळोखाची पिसे’ (१९५४), ‘चांदणे’ (१९५९), ‘चंद्र सावली कोरतो’ (१९६३) आणि ‘मासा व इतर विलक्षण कथा’ (१९६५) हे त्यांचे कथासंग्रह होत.

अद्भुताकडे झुकणारी विमुक्त, स्वैर चमकदार कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी वृत्ती आणि उपहास-उपरोधाची छटा असलेला विनोद ही त्यांच्या काव्याची महत्वाची वैशिष्ठ्ये होत. जीवनातील वैफल्य. नैराश्य आणि एकाकीपणाचे तीव्र दुःख त्यांच्या काव्यातून विलक्षण उत्कटतेने व्यक्त झालेले दिसते. ‘चंद्र सावली कोरतो’ सारख्या त्यांच्या कथांमधून जीवनातील विकृतीचे चमत्कृतीचे आणि अनेक विलक्षण अनुभवांचे चित्रण अतीव वेधकतेने आणि समरसतेने केलेले दिसते. ‘जयकेतू’ (१९५९, सॉफोल्कीझचे ईडीपस रेक्स), ‘ब्रांद’ (१९६३), ‘बादशहा’ (१९६६), ‘गोची’ (१९७४), ‘ज्यांचे होते प्राक्तन शापित’ (१९६५, यूजीन ओनीलचे मोर्निंग बिकम्स इलेक्ट्रा) इत्यादी नाटके त्यांनी लिहिली.

मुंबई येथे १९८१ मध्ये भरलेल्या समांतर मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. साहित्याखेरीज चित्रकला, संगीत या कलांचेही उदंड प्रेम व जाण त्यांना होती. सदानंद रेगे हे मराठी साहित्यातील एक अत्यंत मनस्वी, कल्पक आणि विलक्षण व्यक्तिमत्व होते. अशा या प्रतिभावान कवीचे २१ सप्टेंबर १९८२ रोजी निधन झाले.

First Published on: June 21, 2022 4:00 AM
Exit mobile version