प्रशासकीय यंत्रणेची संवेदनहीनता आणि अनास्थेचे बळी..!

प्रशासकीय यंत्रणेची संवेदनहीनता आणि अनास्थेचे बळी..!

नवी मुंबई खारघर येथील सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेली भीषण दुर्घटना ही केवळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळेच घडलेली नसून एकूणच अमानवी आणि संवेदनहीनतेची परिसीमा म्हणावी लागेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या आध्यात्मिक परिवाराचे एक सदस्य आहेत त्या आध्यात्मिक परिवाराच्या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी पूर्ण दक्षता घेतल्यानंतरही जर अशी दुर्घटना घडत असेल तर ती निश्चितच अत्यंत दुर्दैवी आणि मानवी मनाच्या बोथट झालेल्या संवेदनांचे प्रतिबिंब आहे, असेच म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीसाठी दोन वेळा कार्यक्रम स्थळी आधी भेटी दिल्या होत्या. तसेच सर्व व्यवस्थेची नियोजनाची माहिती घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा दोन वेळा आढावाही घेतला होता. एकनाथ शिंदे हे स्वतः श्री सदस्य असून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निस्सीम भक्त आहेत. इथे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इच्छाशक्तीचा नसून सरकारी यंत्रणा या मुख्यमंत्र्यांनाही खोटे पाडून कसे गुंडाळत आहेत याचा आहे. त्यामुळे रविवारच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सर्वस्वी प्रशासकीय यंत्रणेची कमालीची अनास्था आणि सबकुछ चलता है ही वृत्ती कारणीभूत आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही खोटे पाडणार्‍या अत्यंत निर्ढावलेल्या सरकारी अधिकारी वर्गावर या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

मुळात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे महाराष्ट्रभर तसेच अन्य राज्यांतही लाखो अनुयायी आहेत. नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्यानंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे विचार सर्वसामान्य श्री सदस्यांना मनोमन पटत असल्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने अगदी गावोगावी खेडोपाडी धर्माधिकारी परिवार मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह करून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारतर्फे घोषित केला. त्यामुळे या सोहळ्यासाठी तब्बल वीस लाख लोक उपस्थित राहतील याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्यामुळे या सोहळ्याच्या आयोजनासाठी ज्या दोन आढावा बैठका घेतल्या होत्या त्या बैठकीतदेखील या गर्दीच्या उपस्थितीबाबत पूर्णपणे सरकारी यंत्रणेला कल्पना होती. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम २५ लाख आहे, तर या जंगी सोहळ्याच्या आयोजनावर राज्य सरकारने तब्बल साडेतेरा कोटी रुपये खर्च केले आहेत.

२५ लाखांच्या पुरस्कारासाठी राज्य सरकार साडेतेरा कोटी रुपये खर्च करत असेल आणि तरीही जर उष्माघातामुळे १३ निष्पाप लोकांचे बळी जात असतील तर या कमालीच्या अनास्थेला आणि संवेदनहीनतेला नेमके कोण जबाबदार आहे याचाही शोध श्री सदस्य असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. या सोहळ्याच्या आयोजनामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी असलेले कोकण आयुक्त आणि रायगड जिल्हाधिकारी तसेच मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारच्या वतीने विविध जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी नेमलेल्या सरकारी यंत्रणा नेमक्या यावेळी काय करत होत्या याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे.

सरकारी अधिकारी हे मुख्यमंत्र्यांनादेखील चुकीची माहिती देऊन कशी दिशाभूल करत असतात हे यानिमित्ताने अधिक स्पष्ट झाले आहे. सोहळ्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी ज्या दोन पूर्व आढावा बैठका घेतल्या त्यामध्ये संबंधित अधिकार्‍यांनी ६९ अ‍ॅम्ब्युलन्स, ३५० डॉक्टर्स तेवढ्याच प्रमाणात नर्सेस, १५० टँकर अशा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. प्रत्यक्षात घटनास्थळी केवळ दोन अ‍ॅम्ब्युलन्स असल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे जर २० लाखांच्या घरामध्ये जनसमुदाय जमणार होता तर राज्य सरकारने जे ३५० डॉक्टर्स या सोहळ्यात काही अघटित घडले तर ते हाताळण्यासाठी नियुक्त केले होते ते डॉक्टर्स नेमके होते कुठे याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही.

या सोहळ्यासाठी जे भव्य स्टेज उभारण्यात आले होते त्या स्टेजवर वॉटर कुलरसह अन्य सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मंचावरील नेत्यांना व्हीआयपी सुविधा देण्याला कोणाचा विरोध असण्याचे अथवा वेगळे मत असण्याचे कारण नाही, तथापि जर तुम्ही मंचावर सर्व सुविधा उपलब्ध करून देता तर तुमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जे खेडोपाड्यातून वणवण करत सर्वसामान्य श्री सदस्य आले होते त्यांच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून किमान कापडी मंडप तसेच त्यांना एक छोटी पाण्याची बाटली देण्याचे सौजन्य राज्य सरकारला का वाटले नाही हा खरा यातील प्रश्न आहे.

तसेही राज्य सरकारने या सोहळ्यासाठी साडेतेरा कोटींचे बजेट उपलब्ध करून दिले होते. लाखोंच्या संख्येने जमणार्‍या जनसमुदायाला अर्धा लिटर पाण्याची बाटली आणि वर उन्हात कार्यक्रम असल्यामुळे जर डोक्यावर छप्पर दिले असते तर काहींना जीव गमवावा लागला नसता. तसेच अनेकांचे हाल झाले नसते. ज्या १३ निष्पाप श्री सदस्यांचे निव्वळ सरकारी अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे बळी गेले हे जीव वाचू शकले असते. त्यामुळेच ज्या सरकारी अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्य जनतेसमोर खोटे पाडले त्या झारीतील शुक्राचार्यांवर मुख्यमंत्र्यांनी आधी कारवाईचा बडगा उगारावा, अशी जर अपेक्षा सर्वसामान्य श्री सदस्य करत असतील तर त्यात गैर काय? तसेच या नियोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी कळत नकळत त्रुटी ठेवल्या त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचा बडगा उचलावा, अशी सर्वसामान्य श्री सदस्यांची भोळी भाबडी अपेक्षा आहे. ज्या सनदी अधिकार्‍यांमुळे एवढे महाभारत घडले त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उचललाच पाहिजे.

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती तापलेली असतानाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी १३ श्री सदस्यांना जीव गमावण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या राजकीय नेत्यांकडून सत्ताधार्‍यांवर आरोपांच्या जोरदार फैरी झाडण्यात येत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लाखो लोक एकत्र जमणार असल्यामुळे सरकारने त्यांची योग्य ती काळजी घ्यायला हवी होती, सरकारच्या अनास्थेमुळे श्री सदस्यांचे हाल झाले, काहींना जीव गमवावा लागला, अशी टीकेची झोड उठविण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते आपल्या वज्रमूठ सभा ठिकठिकाणी घेत असताना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेली ही दुर्घटना म्हणजे विरोधकांच्या हाती लागलेले आयते कोलीत आहे. त्याचाच वापर करून विरोधक सत्ताधार्‍यांवर शाब्दिक हल्ले करत आहेत. राजकीय नेत्यांकडून या दुर्घटनेला राजकीय वळण लावण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे, पण असे होऊ नये, म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्यांविषयी आपल्या भावना व्यक्त करून या दुर्घटनेला राजकीय वळण देऊ नये असे आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे ‘श्री’ सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत.‘श्री’ सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे.

या पुरस्कार सोहळ्यावेळी काही सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे आहे, असे निवेदन आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जारी केले आहे. मृत्यू झालेल्या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. ‘श्री’ सदस्य परिवाराची एकमेकांच्या बरोबरीने राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे, त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांबरोबर कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो. तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असंही आप्पासाहेबांनी निवेदनात नमूद केलं आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले हे निवेदन सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण आज महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अतिशय बिघडलेली आहे. राजकीय नेते विविध गटातटात विभागले जाऊन एकमेकांवर ऊठसूट आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यांच्या भाषेचा स्तर अतिशय खाली घसरलेला आहे. खरेतर महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटले जाते. त्याच राज्यातील राजकीय स्थिती तणावाची झालेली आहे. हा तणाव दूर होऊन महाराष्ट्रात राजकीय पातळीवर गुण्यागोविंदाचे वातावरण निर्माण व्हायला हवे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी आप्पासाहेबांच्या शांततेच्या निवेदनासोबत त्यांच्या शिकवणुकीचाही अवलंब करायला हवा, असे या निमित्ताने सूचवावेसे वाटते.

First Published on: April 17, 2023 10:02 PM
Exit mobile version